Saturday, April 27, 2024
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धेचा बिगूल वाजला

राज्य नाट्य स्पर्धेचा बिगूल वाजला

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोना संकटामुळे मागील वर्षी थांबलेला राज्य नाट्य स्पर्धेचा बिगूल यंदा वाजला आहे. १ जानेवारीपासून या स्पर्धेचा प्रारंभ होत असल्याने नाट्यप्रेमी व कलाकार सुखावले आहेत. यासंदर्भात राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

- Advertisement -

हौशी नाट्य कलावंतांसाठी जिव्हाळ्याची असलेली राज्य नाट्य स्पर्धा गेल्या वर्षी करोना महामारीमुळे झाली नाही. करोना नियमांमुळे नाट्यगृहे, सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने अनेक महिने नाट्यमंचापासून दूर राहिल्याने कलावंत हवालदिल झाले होते. यंदा मात्र स्पर्धा होणार असल्याने कलाकार आनंदून गेले आहेत. स्पर्धेसाठी नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांकडून १५ ते ३० नोव्हेंबर या दरम्यान प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.

स्पर्धेकरीता ३००० रुपयांच्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील.

आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका ३० नोव्हेंबरपर्यंत संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई – ३२ या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन सांस्कृतिक संचालनालयाने केले आहे. स्पर्धेची अंतिम फेरी १ फेब्रुवारीपासून होईल.

हौशी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ असणारी राज्य नाट्य स्पर्धा मागील वर्षी करोना संकटामुळे झाली नव्हती. यंदा मात्र स्पर्धा होणार असल्याने कलाकारांत उत्साह संचारला आहे. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाचे स्वागत आहे.

पी. डी. कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी

- Advertisment -

ताज्या बातम्या