Friday, April 26, 2024
Homeनगरराजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी सर्व संचालकांना आरोपी करा

राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी सर्व संचालकांना आरोपी करा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेत झालेल्या अपहारप्रकरणी लेखापरीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावरून अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक, वसुली अधिकारी, तत्कालीन लेखापरीक्षक आदींवर गुन्हा दाखल झाला असला तरी या अपहारास संस्थेचे सर्व संचालक तितकेच जबाबदार असून सर्व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ठेवीदार बचाव कृती समितीने काल पत्रकार परिषद घेवून केली.

- Advertisement -

राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेच्या 7 कोटींहून अधिक रकमेच्या अपहारात लेखापरीक्षक संजय धनवडे यांनी प्राथमिक अहवालात संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब तुकाराम येवले, उपाध्यक्ष शरद लक्ष्मण निमसे, व्यवस्थापक कारभारी फाटक तसेच लेखापरीक्षक व पतसंस्थेचे कर्मचारी याप्रमाणे 9 आरोपींवर ठपका ठेऊन फौजदारी गुन्हा जरी दाखल केला असला तरी या सर्व अपहारास संस्थेचे सर्व संचालक तितकेच जबाबदार असून सर्व संचालक मंडळास आरोपी करून गुन्हे दाखल करून त्वरीत अटक करावी, अशी मागणी राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या ठेवीदारांनी स्थापन केलेल्या ठेवीदार बचाव कृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

याबाबत ठेवीदार बचाव कृती समितीच्यावतीने राहुरीत पत्रकार परिषद घेऊन लेखापरीक्षकाचा अहवाल व त्यातून कशाप्रकारे उर्वरित संचालकांना गुन्ह्यातून वगळण्याचा प्रयत्न केला गेला याची माहिती दिली. लेखापरीक्षक संजय धनवडे यांनी केलेल्या लेखापरीक्षणातून 2015 पुर्वीच्या संस्थेच्या व्यवहारातील गंभिर बाबी दुर्लक्षित केल्यामुळे तत्कालीन रोखपाल यांचे नावे कर्ज दिसत असताना त्यांना गुन्ह्यातून वगळण्याचा प्रयत्न नेमके कोणाला वाचविण्यासाठी झाला? याचा तपास तपासी अधिकार्‍यांनी करावा.

2015 पर्यंत विद्यमान संचालिका मंदाताई शरद निमसे या स्थापनेपासून चेअरमनपदावर कार्यरत होत्या. त्याच प्रमाणे लेखापरीक्षण करताना ज्याप्रमाणे ठेवीदाराच्या रूजवती घेण्यात आल्या. मात्र, संस्थेचे कामगार व संचालकांच्या कर्जदार नातेवाईक तसेच इतर कर्जदारांच्या रुजवती का घेण्यात आल्या नाही? असा सवाल करतानाच यातून नेमके कोणाला वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांसह व्यवस्थापक व कर्मचार्‍यांनी केलेल्या अपहारीत रकमेबाबत उर्वरित संचालक मंडळाने वेळोवेळी मूकसंमती देऊन सर्व बैठकांमध्ये मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी दिल्याने या अपहारास संयुक्तीक व एकत्रित जबाबदारी निश्चितीतून संचालक मंडळ तेवढेच जबाबदार असल्याचा दावा केला.

संस्थेचे उर्वरित संचालक मंदाताई शरद निमसे, वसंत कृष्णाराव झावरे, संजय एकनाथ शेळके, डॉ. दादाभाऊ यादव, किशोर सखाराम जाधव, मंगलताई भाऊसाहेब साबळे, प्रतिभाताई संजय पवार, बाबुराव बापूजी कोठूळे, दीपक सुखलाल बोरा, कारभारी बापूसाहेब फाटक, नंदा इंद्रभान वराळे हे सर्वजण संस्थेत झालेल्या अफरातफरीस जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी ठेवीदार बचाव कृति समितीने केली.

यावेळी कुमार डावखर, सुनील भुजाडी, वनिता जाधव, आयेशा शेख, सुयोग सरोदे, राजेंद्र पागिरे, नागेश पानसरे, कल्याण राऊत, अशोक वराळे, जगन्नाथ घाडगे, सुरेश कोकाटे, गोरक्षनाथ औटी, राजेंद्र जाधव, मयूर धोंडे, प्रा.जैन, डोखे, पवार, हापसे, रामेश्वर कैतके, ज्ञानदेव जाधव आदी ठेवीदार उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या