Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरऑक्सिजनसह रेमडेसिवीर उपलब्ध असणारे करोना सेंटर सुरु का करत नाही? - थोरात

ऑक्सिजनसह रेमडेसिवीर उपलब्ध असणारे करोना सेंटर सुरु का करत नाही? – थोरात

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

डोळ्या देखत जिवाभावाची माणसे जात आहे. मरण इतके स्वस्त झाले आहे का? माणसांचा आक्रोश किती दिवस पाहाणार असे एक ना अनेक प्रश्न आज माणुसकीला काळीमा फासत आहे. राज्यात अनेक मातब्बर माणसे आहेत. मग ऑक्सिजन बेडसह रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असणारे सेंटर सुरु का करत नाही? असा सवाल गणेशचे संचालक राजेंद्र थोरात यांनी केला.

- Advertisement -

राजेंद्र थोरात यांनी म्हटले आहे की, जर 2019 च्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये भारतात येणारी व बाहेर जाणारी विमानसेवा काही दिवसासाठी सुरुवातीला बंद केली असती तर आज अनेकांचे बळी गेले नसते. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळ झाली नसती. लाखो कामगार मजूर यांचा रोजगार गेला. कित्येकांना आत्महत्या करण्याची वेळ आली. यासारख्या असंख्य समस्या निर्माण झाल्या हे वास्तव आहे.

केंद्र व राज्य सरकार असा राजकिय वाद करून काय सिद्ध करणार आहेत. दोन्ही सरकार जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलेली आहेत. मग सेवा करण्याची वेळ असताना राजकिय आरोप प्रत्यारोप करणे योग्य नाही. इथे माणसाच्या जीवन मरणाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. माणसेच राहिली नाहीतर आरोप-प्रत्यारोप करणे उपयोगाचे नाही. या वांझोट्या टिका टिपण्या बैठका करून माणसाच्या जीवाशी खेळू नका. करोनाच्या भंयकर स्थितीत अनेक जण जिवाची बाजी लावून शक्य तेवढी मदत करीत आहे. डॉक्टर, नर्स, दानशूर व्यक्ती, अनेक संस्था सर्व मिळून योद्ध्यासारखे काम करीत आहे.

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अनेकांचे प्राण जात आहे. करोना रुग्णावरील उपचाराची परिस्थिती सुधारण्यास ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन या उपचारासह करोना सेंटर सुरु केले पाहिजे. देखभाल करणार्‍या करोना सेंटररचा प्राथमिक स्वरूपात उपयोग होईल. यात अनेक जन प्रसिध्दींचा स्टंट करीत आहे. निवडणुकीत लाखो करोडोचा खर्च करणारी सर्व राजकीय पक्षाची निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. करोनाच्या काळात यंत्रणा कुठेही दिसत नाही. म्हणून डोळ्या देखत जिवाभावाची माणसे जात आहे. राज्यात अनेक मातब्बर माणसे असताना ऑक्सिजन बेडसह रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असणारे बेडचे सेटर सुरु का करत नाही, असा सवाल राजेंद्र थोरात यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या