Thursday, April 25, 2024
Homeराजकीयराजीव सातव अनंतात विलीन

राजीव सातव अनंतात विलीन

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय राजकारणातील पक्षाचे अभ्यासू नेते अ‍ॅड. राजीव सातव यांचे रविवारी पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात निधन झाले.

- Advertisement -

राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान कळमनुरी येथे अंत्यविधी करण्यात आले. मुलगा पुष्कराज याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबतच इतरही मोठ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हजेरी कळमनुरी येथे पाहायला मिळाली.

राजीव सातव यांच्या अंत्यसंस्काराला कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देताना सार्‍यांनाच भावना आवरणं कठीण झाले होते. दरम्यान अंतिम संस्कारांपूर्वी राजीव सातव यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना देण्यात आली.

हिंगोली सारख्या एका छोट्याश्या जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य ते थेट खासदार अशी अत्यंत कमी वयात राजीव सातव यांनी मजल मारली. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक बाणा असलेले राजीव सातव यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठं योगदान दिले. उच्च विचारसरणी आणि साधी राहणीमान या धोरणाने काँग्रेस पक्षात त्यांनी आपले मोठे वजन निर्माण केले होते. पक्षातही युवक काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष ते युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अशी पद त्यांनी भूषवली.

राजीव सातव यांना २३ एप्रिल राेजी त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने २६ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवून व्हेंटिलेटरवर ठेवले होते. करोनातून बरे झाल्यानंतर त्यांना फुप्फुसात न्यूमाेनियाचा संसर्ग झाला. प्रकृती बिघडत गेली व रविवारी पहाटे खा. सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या