Saturday, April 27, 2024
Homeनगरमुलाने घेतला पित्याच्या खुनाचा बदला!

मुलाने घेतला पित्याच्या खुनाचा बदला!

सुपा |वार्ताहर| Supa

नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याच्या हत्येचे गूढ उकलले असून दिवंगत उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम यानेच हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच तलवारीचे वार करून शेळकेला ठार केल्याची कबुली त्याने शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाजवळ दिली.

- Advertisement -

राजकीय वर्चस्व व आपसातील भांडणाच्या कारणावरून नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याने भाडोत्री शार्प शुटरकडून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची हत्या घडवून आणली होती. याप्रकरणी शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहुल तसेच इतर तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राजारामसह इतर आरोपींना न्यायालयाने पॅरोल रजा मंजूर केली होती. त्यानंतर शेळके नाराणगव्हाण येथील त्याच्या शेतामध्ये वास्तव्यास होता.

शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल कांडेकर यांचा मुलगा संग्राम याच्या मनात होती. शेळके सुटीवर आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची योजना त्याने आखली. त्यासाठी त्याने एक धारदार तलवार उपलब्ध करून ठेवली होती. घटनेपूर्वी तीन-चार दिवसांपासून संग्राम हा शेळकेच्या मागावर होता. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास मजुरांना सूचना देऊन शेळके एकटाच घराकडे परतत होता. ही संधी साधत संग्राम याने पाठीमागून येत शेळकेच्या मानेवर तलवारीचा जोरदार प्रहार केला. एकाच प्रहारामध्ये राजाराम जमिनीवर कोसळला. त्याच्या मानेवर आणखी दोन वार करून उसात लपला. शेळके जागेवरच ठार झाला. ही माहिती संग्रामनेच पोलिसांना दिली. संग्राम याने अंगावर दोन टी शर्ट परिधान केले होते. हत्येनंतर एक टी शर्ट याने उसामध्ये फेकून दिला.

हत्येचा बदला घेतल्यानंतर संग्राम दुचाकीवरून शिरूर येथे गेला. एटीएममधून पाचशे रुपये काढून त्याने पानाचा आस्वाद घेतला. त्यानंतर काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संग्राम यास अटक केली. शनिवारी त्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथाकाकडे गुन्ह्याची कबुली दिली. खुनाची उकल झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सर्व टीम वर्कच्या कष्टाचे यश आहे. अपर पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कटके यांच्या पथकाने शिताफीने तपास करून गुन्ह्याची उकल केली. आरोपीकडून हत्यार जप्त करण्यात आले आहे.

– डॉ. नितीनकुमार गोकावे, निरीक्षक, सुपा पोलीस ठाणे

आरोपींमध्ये पोलीस

गणेश भानुदास शेळके व अक्षय पोपट कांडेकर या दोन आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली. शेळके हा पोलीस दलामध्ये चालक म्हणून कार्यरत आहे. त्यास नगर येथून ताब्यात घेण्यात आले. कांडेकर यास म्हसे (ता. श्रीगोंदा) येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या