रांजणखोल ग्रामपंचायत निवडणूक हालचालींना वेग

रांजणखोल | Rajankhol

राहाता तालुक्यातील रांजणखोल ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्यामुळे भेटीगाठीला वेग आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यास गावातील राजकारण थंडीतही गरमागरम झाले आहे.

गावाच्या विकासाला चालना मिळण्यासाठी ग्रामपंचायत अतिशय महत्वाचे माध्यम मानले जाते. त्यामुळेच ग्रामपंचायतीवर आपल्या गटाची किंवा पक्षाची सत्ता असावी, याकरिता प्रत्येक राजकीय नेता पुढाकार घेताना दिसत आहे. जेणेकरून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या विकासाचे श्रेय घेणे त्यांना सहज शक्य होते. आता पुन्हा एकदा थेट जनतेतून सरपंचांची निवड होणार आहे.

रांजणखोल ग्रामपंचायत महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मुळा प्रवरा संस्थेचे ज्येष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे यांच्या नेतृत्वाखाली सध्या कार्यरत आहे. ना. विखे पाटील यांच्या प्रयत्नातून व अंबादास पाटिल ढोकचौळे यांच्या पुढाकारातून रांजणखोल परिसरात अनेक कोटी रुपयांची विकास कामे झाली व काही कामे प्रगतिपथावर आहेत. सरपंच चांगदेव ढोकचौळे यांना प्रथम लोकनियुक्त सरपंच पदाचा मान मिळाला होता. यंदाही सरपंचपद जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे अनेक मंडळींना सरपंच पदाचे स्वप्न पडू लागले आहे. सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. 13 जागांसाठी ही निवडणूक होत असून यामध्ये 50 टक्के महिला राखीव आहेत. त्यामुळे खाजगी व गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत.

काही प्रभागातील आरक्षण रचना बदलल्यामुळे सदस्य होऊ इच्छिणार्‍यांना नवीन प्रभाग शोधावा लागत आहे तर काही मंडळींना आपल्या पार्टीकडून उमेदवार द्यायलाही अडचण होत आहे. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाचे रांजणखोल ग्रामपंचायतीत प्राबल्य आहे. ना. विखे पाटील प्रणीत जनसेवा मंडळ व रांजणखोल परिवर्तन आघाडी या दोन गटांतच लढत होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. तरीही सरपंचपदाची उमेदवारी अर्ज चार ते पाच जण भरण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे व काही अपक्षही अर्ज भरणार आहेत. सरपंचपदासाठी कोण रिंगणात असणार हे अर्ज माघारीच्या वेळेस स्पष्ट होणार आहे.

दि. 28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरणे, 18 डिसेंबरला मतदान व 20 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने सरपंचाच्या दावेदारांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. इच्छुक उमेदवार तयार करणे, गाठीभेटी घेणे, पॅनल तयार करणे, तहसील किंवा तत्सम ठिकाणी जाऊन कागदपत्रांची जुळवाजुळव करणे या कामासाठी गावपुढार्‍यांची तालुक्याच्या ठिकाणी वर्दळ वाढली असून हळूहळू ग्रामपंचायत निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.

राजकारणात ग्रामपंचायत ही पहिली पायरी समजली जाते. ग्रामीण राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व गावपातळीवर पकड मजबूत करण्यासाठी गाव पुढार्‍यांसह तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडूनही या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. भर थंडीत ग्रामपंचायत निवडणुकांच्या बरसातीने ग्रामीण भागातील राजकारण तापणार आहे. सध्यातरी प्रत्येकजण समोरचा काय भूमिका घेतो याकडे टक लावून बसला आहे. समोरचा जोपर्यंत आपली भूमिका मांडत नाही तोपर्यंत आपला पत्ता फेकायचा नाही, असे धोरण सध्या इथे बघायला मिळत आहे. परस्पराविरुद्ध दंड थोपटायला अगदी थोडा काळ बाकी आहे.

भाजप-शिवसेना या युती सरकारच्या काळात सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2019 पर्यंत जिल्ह्यातील सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली. मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. या सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द केला. आता भाजप-शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर आले. त्यांनी पुन्हा सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *