राज ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, ‘या’ प्रश्नावर झाली राज्यपालांशी चर्चा

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई | Mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली, या भेटीत वाढील वीज बिल आणि दूध दरवाढ या दोन मुद्द्यावर प्रामुख्याने राज ठाकरेंनी राज्यपालांशी चर्चा केली. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, याबाबत गरज पडल्यास मुख्यमंत्री, शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले.

वीजबिलांचा विषय मनसे लावून धरत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं करत आहे. अदानी, वेस्टची लोकं भेटली. आम्ही बिल कमी करु शकतो मात्र एनईआरसी कमी करावा लागेल. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते सांगतात. परंतु अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यपालांशी बोललो, ते म्हणाले शरद पवारांचा सल्ला घ्या. मी शरद पवारांना भेटणार आहे. हा विषय राज्य सरकारला माहित आहे, मग हे प्रकरण कशात अडकलंय हे कळत नाही. त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्याच संदर्भात पहिलं निवेदन राज्यपालांना भेटून दिलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच मी शरद पवार यांच्याशी बोलणार आहे, फोनवरुन बोलेन किंवा प्रत्यक्ष भेटून बोलेन. वेळ पडल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. मात्र त्यांना कोणताही विषय सांगितला तर त्यावर काम सुरु आहे. काम सुरु आहे, पण निर्णय व्हावा. त्यामुळे लोकांची भावना पाहता सरकारने एक-दोन दिवसात निर्णय घ्यावा, अशी विनंती आहे. पुढे त्यांच्याशी बोलणार आहे. राज्यपालही बोलणार त्यांच्याशी बोलणार आहेत. परंतु सरकार आणि राज्यपालांमधील सख्य पाहता हा विषय किती पुढे जाईल याची मला कल्पना नाही. राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल सरकारशी बोलतील,” असं राज ठाकरे म्हणाले.

विषय खूप आहेत पण सरकारने निर्णय घ्यायला हवेत. आपल्याकडे प्रश्नांची कमतरता नाही, निर्णयांची कमतरता आहे, असंही राज ठाकरे यांनी सागितलं. दरम्यान, राज्य सरकार नेमके निर्णय घेत नाही. अनेक गोष्टींमध्ये धरसोड करत आहे. असे कुंथत कुंथत सरकार चालत नाही. काय तो ठाम निर्णय घ्यायला पाहिजे असे राज ठाकरे या वेळी म्हणाले. तसेच, सरकारने मंदिरे, शाळा आणि इतर गोष्टी कधी उघडणार आहात याबाबत स्पष्ट काय ते एकदा राज्याच्या जनतेला सांगायला हवे असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे सध्या भलतेच चर्तेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र असो, त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेले प्रत्युत्तर असो किंवा शरद पवार यांना राज्यपालांनी पाठवलेल्या कॉफी टेबल पुस्तकावार पवारांनी दिलेला अभीप्राय असो. राज्यपाल चर्चेत आहेत. शिवसेना दसरा मेळाव्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली होती. त्यामुळेही राज्यपाल चर्चेत आहेत. आता राज ठाकरे यांच्या भेटीमुळे कोण चर्चेत येते किंवा राहते याबाबतही उत्सुकता कायम आहे. राज्यात लॉकडाऊन सुरु असताना राज्यातील विविध संस्था, संघटनांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यात जीम चालक-मालक, मंदिरे उघडा अशी मागणी करणाऱ्या संघटना त्यासोबतच इतरही अनेकांचा समावेश होता. त्यामुळे राज्यपाल आणि राज ठाकरे यांना भेटायला आलेल्या लोकांची भावना एकच होती की मंदिरे उघडा. आता या भेटीत काय चर्चा होते याबाबत उत्सुकता होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *