Friday, April 26, 2024
Homeनगररेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट राबविणार्‍या बोरावके महाविद्यालयाचा राज्यातील पहिलाच उपक्रम

रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट राबविणार्‍या बोरावके महाविद्यालयाचा राज्यातील पहिलाच उपक्रम

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत जाणार आहे, पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याऐवजी बहुतांश ठिकाणी नदी नाल्यातून वाहून जाते. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. लोकांना फक्त पाणी उपसण्याची सवय झालेली आहे, आता पाणी जिरविण्याची सवय प्रत्येकाला लावून घ्यावी लागणार आहे. भविष्यकाळातील जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयाच्या 42 एकराच्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून सुरू करण्यात आला. त्यामुळे पावसाच्या प्रत्येक पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत जिरविला जात आहे. श्रीरामपुरातील पावसाचे पर्जन्यमान साधारण पाचशे मि.मी. इतके असून दर वर्षी महाविद्यालय परिसरात सुमारे नऊ कोटी लिटर पाणी जमिनीत जिरविले जाते. यासाठी सुमारे दोन लाख रुपये पर्यंत खर्च आला आहे.

- Advertisement -

उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळे अनेक बोअर बंद पडले होते. या योजनेमुळे बोअरला उन्हाळ्यात सुद्धा चार इंची पाणी आहे. विशेष म्हणजे हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. रयत संकुलामध्ये सध्या 6-7 बोअर आहेत. यातील बरेच बोअर पाण्याअभावी बंद होते. अशा बोअरच्या शेजारी मोठा खड्डा घेऊन दगड, विटा, वाळू, कोळसा, खडीचा थर देऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट राबविण्यात आला. शास्त्रीय पद्धतीचा वापर करून फिल्टर बेड तयार करण्यात आले, त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. ज्या बोअरला पाणी नव्हते अशा बोअर मधून चार इंच पाणी वाहू लागले. या प्रोजेक्टमुळे रयत संकुलाशेजारी असणार्‍या इतर बोअरला सुद्धा मोठा फायदा झालेला आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सील सदस्या श्रीमती मीनाताई जगधने, प्रकाश पाटील निकम, डॉ. रवींद्र जगधने, सुजित जगधने, प्रा. के एच. शिंदे, प्राचार्य एन. एस. गायकवाड, यांच्या संकल्पनेतून रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट राबविला आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम राज्यातील कुठल्याही शिक्षण संस्थेत राबविलेला नाही. श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयाने हा प्रोजेक्ट राबवून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. हा प्रोजेक्ट सर्वांसाठी प्रेरणादायी, पथदर्शक आहे. शेतकर्‍यांसह इतर संस्थांनी अनुकरण केले पाहिजे.

– मीनाताई जगधने, चेअरमन, रयत संकुल, श्रीरामपूर

मी भूगोल विषयाचा प्राध्यापक, परंतु पर्यावरण, शेती, पाणी याविषयीचे बाळकडू मला माझ्या कुटुंबियापासूनच मिळाले. पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रकल्प बोरावके महाविद्यालयात राबविला. प्रत्येक शेतकर्‍यांनी कमीत कमी रेन वॉटर हार्वेस्टिंग रिचार्ज प्रोजेक्ट केला पाहिजे. अशा पद्धतीच्या प्रकल्पामुळेे उन्हाळ्यात सुद्धा शेतकर्‍यांना शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध होऊ शकते.

– प्रा. डॉ. सुनील चोळके, बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या