Thursday, April 25, 2024
Homeनगररेल्वे अंडरग्राऊड पुलाखालील रस्त्याची दयनीय अवस्था

रेल्वे अंडरग्राऊड पुलाखालील रस्त्याची दयनीय अवस्था

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रेल्वे अंडरग्राऊंड पुलाखालील रस्ता खूपच खराब झाला असून लोकांना पायी चालणे सोडा मात्र वाहनधारकांना मोठी कसरत करत जावे लागते. या रस्त्यामुळे अनेकांंना पाठिचे दुखणे वाढले असून ह्दयविकाराचे दुखणे असणार्‍यांचा त्रास वाढला आहे. या रस्त्याबाबत अनेकवेळा तक्रारी करुनही पालिका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. तरी पालिकेने शिवाजी चौक ते सय्यद बाबा चौकापर्यंतचा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी व्यापारी मर्चंटचे संचालक सुनील गुप्ता यांनी केली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील सय्यद बाबा दर्गाहजवळील रेल्वे अंडरग्राऊड पुल हा शहराच्या दोन भागांना जोडणारा भाग आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना या पुलाचा मोठा आधार आहे. रेल्वे विभागाने दुहेरीकरणासाठी पूल मोठा करुन दुहेरीकरणाचा प्रश्न सोडवला. सदरचे काम करताना या पुलाखालील सिमेंट ओतुन तात्पुरत्या स्वरुपात रस्ता सुरु केला. मात्र या पुलाचे काम होवून जवळपास चार ते पाच महिने झाले. मात्र या पुलाखालील रस्ता हा पावसामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्यात अनेक मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जातांना अनेकांना पाठिच्या आजाराने आमंत्रण घेवूनच जावे लागते.

या खड्ड्यातून जाताना अनेकांना अपघातही झाले आहेत. या रस्त्याशिवाय अलिकडे किंवा पलिकडे जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे नागरिकही अशा प्रकारचा त्रास सहन करुन त्या पुलाखालून जा-ये करत असतात. तसेच या पुलाच्या पलिकडे अनेक प्रकारचे रुग्णालये असून शाळा महाविद्यालये आहेत. तसेच सर्व सरकारी कार्यालयेही या भागात असल्यामुळे सर्वांनाच या भागातून त्या भागात जावेच लागते.

मात्र या रस्त्यावरुन जाणे म्हणजे घरी आजारपण घेवून जाणे असेच होत असते. तसेच या रस्त्यावरुन ह्रदय विकाराच्या त्रासाच्या व्यक्तीला माणसाला जीव मुठीत घेवूनच जावे लागते. यामुळे काहींचा जीव जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. या रस्त्यांवरुन जात असतानाही अपघातही होत असतात. त्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका असल्यामुळे पालिकेने जनतेच्या आरोग्याशी खेळू नये,

पालिकेने नागरिकांची गैरसोय दूर करुन आरोग्यास बाधा होणार नाही यासाठी पालिकेने तातडीने या रस्त्याची पहाणी करुन सदरचा रस्ता दुरुस्त करावा व लोकांची गैरसोय दुर करावी. अशी मागणी सुनील गुप्ता यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या