रेल्वे आरक्षण कार्यालय होणार बंद?

jalgaon-digital
3 Min Read

नाशिकरोड ।प्रतिनिधी Nashikroad

नाशिक शहरातील ( Nashik City ) हजारो रेल्वे प्रवाशांसाठी ( train passengers) सोयीचे असणारे, रेल्वेला वर्षाला कोट्यवधीचा महसूल मिळवून देणारे तिबेटीयन मार्केटमधील रेल्वे रिझर्व्हेशन कार्यालय ( Railway Reservation Office )बंद होणार आहे. मनुष्यबळ आणि तिकीट खिडक्या कमी करून रेल्वेने त्या दिशेने पावले टाकली आहेत. कार्यालय बंद झाल्यास प्रवाशांना वेळ, पैसा, उर्जा खर्च करून, जीव धोक्यात घालून नाशिकरोडला ( Nashikroad )जाऊन रिझर्व्हेशन करावे लागणार आहे. महापालिकेच्या निगरगट्ट भूमिकेमुळे कार्यालय बंद करण्याची वेळ रेल्वेवर आल्याचे समजते.

पंचवटीतील रविवार कारंजा येथे असलेले हे रिझर्व्हेशन कार्यालय मार्च 2003 साली तिबेटीयन मार्केटमध्ये महापालिका इमारतीत आले. शेजारीच पुणे विद्यापीठाचे कार्यालय आहे. व्दारका, पंचवटी, मेरी, म्हसरुळ, सातपूर, सिडको, पाथर्डी अशा परिसरातूनच नव्हे तर त्र्यंबकेश्वर, घोटी, ओझर या ग्रामीण भागातूनही प्रवासी रेल्वेच्या या कार्यालयात रिझर्व्हेशनसाठी येतात. या कार्यालयामुळे इतर व्यावसायिकांना व्यावसाय-रोजगार मिळत आहे.

नाशिकरोड स्थानकातील रिझर्व्हेशन कार्यालयासारखाच मोठा महसूल शहरातील हे कार्यालय रेल्वेला देते. दररोज आठशे आणि वर्षाला सुमारे तीस हजार प्रवासी येथे तिकीट बुकींग करतात. वर्षाला पन्नास हजार तिकीट काढली जातात. रोजचा चार लाख आणि वर्षाला सुमारे पाच कोटीचा महसूल या कार्यालयातून रेल्वेला मिळतो. यावरुन प्रवाशांचा प्रतिसाद व मोठी गरज लक्षात येते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी आठ ते रात्री आठ असे कार्यालय सुरु असते.

तीन गाळ्यात हे कार्यालय सुरु आहे. लाईटबिल, इंटरनेट व इतर खर्च रेल्वेला येतो. तुकाराम मुंडे आयुक्त असताना महापालिकेने आपल्या गाळ्यांचे भाडे तिप्पट केले. त्यामुळे रेल्वे रिझर्व्हेशन कार्यालयाचे भाडे वर्षाला पन्नास हजारावरून तीन लाख झाले आहे. रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले की, हा खर्च, कर्मचारी वेतन धरून वार्षिक एक कोटी खर्च रेल्वेला या कार्यालयापोटी येतो. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही शहर कार्यालय सुरु ठेवले.

नाशिकरोडला जे तिकीट शुल्क आहे तेच शहर कार्यालयात आहे. खर्च वसुलीसाठी जादा शुल्क रेल्वे आकारत नाही. व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन शहर कार्यालय नाशिकरोडला स्वजागेत नेले तर एक कोटी खर्च वाचणार आहे. महापालिका आयुक्त, महापौर, लोकप्रतिनिधी यांना वारंवार पत्रे देऊन, भेटूनही महापालिका व्यावसायिक दरच आकारत आहे. त्यामुळे कार्यालय बंद करण्याच्या निर्णयावर रेल्वे प्रशासन आले आहे.

तिबेटीयन मार्केटमधील रिझर्व्हेशन कार्यालयात आठवड्यापूर्वी सहा खिडक्या सुरु होत्या. आठ कर्मचारी कार्यरत होते. महापालिका भाडे कमी करत नसल्याने रेल्वेने आता दोन खिडक्या सुरु ठेवल्या असून तीन कर्मचारी रोज आठशे प्रवाशांना सामोरे जात आहेत. दुपारी आठ ते रात्री आठ दरम्यान एकच तिकीट खिडकी उघडी असल्याने तीनशेच्यावर प्रवाशांचीगर्दी होते.

मनुष्यबळ कमी ताण जादा यामुळे वाद उदभवत असून कर्मचार्‍यांवरील ताण वाढला आहे. रात्री आठनंतर या इमारतीत शुकशुकाट होतो. कर्मचारी एकच असतो. लूटमारीचा धोका असल्याने रोकड व जीव धोक्यात घालून काम करावे लागते. या कार्यालयाशेजारीच यात्री तिकीट सुविधा केंद्र (वायटीएसके) हे खासगी रिझर्व्हेशन कार्यालय सुरु झाले आहे. तेथे तिकीटावर तीस रुपये जास्त लागतात. त्यामुळे प्रवाशांना भुर्दंड पडतो. रेल्वे कार्यालयात गर्दी वाढल्याने प्रवाशांना नाईलाजाने खासगी केंद्राकडे जावे लागत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *