Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विचाराचे पदाधिकारी निवडून द्या!

राहुरी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विचाराचे पदाधिकारी निवडून द्या!

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शहरातील आपला माणूस आमदार मंत्री झाल्यावर विकास कामांचा असा फायदा मिळत असून शहराचे रूप येत्या 2 ते 3 वर्षांत पूर्ण पालटणार आहे. पुढील अडीच वर्ष राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची जी संधी आहे, त्या संधीचा फायदा शहरवासियांना घ्यायचा असेल तर आगामी दोन महिन्यांनी होणार्‍या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे पदाधिकारी निवडून देण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जा नगरविकास राज्यमंत्री व गोंदियाचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीकरांना केले.

- Advertisement -

दरम्यान, राहुरी शहराची पाणीयोजना मुळा धरण येथून कार्यान्वित होत आहे. त्याठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी अडचण होती. त्यासाठी ऊर्जाखात्याचा मंत्री होताच त्याठिकाणी एक्सप्रेस फिडर टाकला असून तो लवकरच कार्यान्वित होताच शहराच्या पाणीयोजनेस आता थेट वीजपुरवठा सुरू होणार असल्याने पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार असल्याचे ना. तनपुरे यांनी स्पष्ट केले.

राहुरी नगरपालिकेस प्राप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण विकास निधीतून 6 कोटी 81 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांच्याहस्ते शहरातील विविध प्रभागात संपन्न झाला. त्यानंतर राहुरी नगरपालिका कार्यालयासमोरीलगंणात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. यावेळी राहुरी पालिकेचे प्रशासक डॉ. सचिन बांगर, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे, अशोक आहेर, श्रीमती सुमती सातभाई, दशरथ पोपळघट, सौ. राधा साळवे, मुक्ताबाई करपे, दिलीप चौधरी, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा शारदा खुळे, शहराध्यक्षा अपर्णा घमाळ, शहराध्यक्ष संतोष आघाव, आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

ना. तनपुरे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी याच जागेवर कार्यक्रम घेऊन पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राहुरी नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यावेळी असे स्वप्नातही वाटत नव्हते की आपण याच नगरपालिकेत नगरविकास मंत्री म्हणून येऊ. त्यानंतर अडीच वर्षांनी विधानसभेच्या निवडणुकीत शहरातील मतदारांनी मला मताधिक्य दिल्याने मी आमदार म्हणून निवडून आलो. यात राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील मतदारांच्या सहकार्यामुळेच ही संधी प्राप्त झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला चक्क 6 खात्याचा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपविला. नगराध्यक्ष असताना ज्या नगरविकास खात्यात कामासाठी अर्ज निवेदन घेऊन रांगेत उभे राहावे लागत होते, त्याच नगरविकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून आज काम करताना शहराचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावत असल्याचे समाधान मिळत आहे.

ना. तनपुरे म्हणाले, शहरासाठी गेल्या अडीच वर्षांत जवळपास 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजना वगळून आणला आहे.त्यात जॉगिंग ट्रॅकसाठी पहिल्या टप्प्यासाठी 2.50 कोटी परत दुसर्‍या टप्प्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करून आणले असून पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथवर आहे. दुसर्‍या टप्प्यात सौंदर्यकरण व इतर कामांचा समावेश आहे. जलतरण तलावासाठी 3 कोटी 60 लाख रुपयास तांत्रिक मान्यता मिळाली आहे. शहरातील पदवीधर युवकांना स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासासाठी 1.50 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला असून या अभ्यासिकेत ग्रामीण भागातील मुलांच्या अभ्यासाची सोय होणार आहे.

मुळा नदीला जर पावसाळ्यात पाणी आल्यास नदीकाठचा भाग कापला जातो. त्यासाठी मुळा नदीकाठावर संरक्षक भिंत बांधण्यासाठी संबंधित विभागातील अधिकार्‍यांसोबत बैठका झाल्या आहेत. त्यातच मुळा नदीकाठावर जे घाट आहेत, त्यात नावघाट, गणपती घाटाचे सौंदर्यकरण करण्याचा प्रयत्न आहे. शहरातील जमा होणार्‍या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरात सर्वंकष भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला असून संबंधित अधिकारी वर्गाबरोबर बैठका झाल्याचे सांगितले. शहरातील पाणी प्रश्नाबाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन नवीन 28 कोटी रुपयांची सुधारीत पाणी योजना मंत्री होताच मंजूर करून आणली असून या योजनेच्या राहुरी शहरातील जलकुंभ व येवले आखाडा येथील जलकुंभाचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगून याबाबत बराच काळ योजना मंजुरीच्या श्रेयवादात गेला. राहुरी शहर हे बीनवेशीचे गाव आहे. त्यासाठी शहरात 3 वेशी उभारण्याचे काम हाती घेत असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.

कार्यक्रमास एकनाथ तनपुरे, संजय साळवे, गजानन सातभाई, रामूशेठ अग्रवाल, दीपक साळवे, ज्ञानेश्वर जगधने, किशोर कातोरे, बाळासाहेब गिरमे, अभिजीत धाडगे, प्रवीण कदम, गणेश धाडगे, संकेत दुधाडे, अरुण तनपुरे, स्वप्नील भास्कर, वैभव वराळे, अवधूत कुलकर्णी, मधुकर घाडगे, रवींद्र तनपुरे, प्रकाश तोडमल, पाराजी तनपुरे, सोपानराव तनपुरे, मदन तनपुरे, ओंकार कासार, गणेश वराळे, सडेचे सरपंच चंद्रकांत पानसंबळ, पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारीसह महिला, नागरिक, युवक उपस्थित होते. नगरसेवक शहाजी जाधव यांनी आभार तर संतोष आघाव व गणेश तनपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

करोनामुळे दोन वर्षे राज्य सरकारच्या निधीवर मर्यादा आल्या होत्या. तरीही राहुरीकरांनी विधानसभेत पाठवून त्यातून मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग राहुरी शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणून विकास कामे मार्गी लावण्यासाठी केला. यापुढील काळातही शहर सर्वच बाबतीत विकासाच्यादृष्टीने पुढे राहील, यासाठी प्रयत्नशील राहणार आहेच. येणार्‍या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराची सत्ता नगरपरिषदेवर राहुरीकरांनी द्यावी, राज्यातील एक आदर्श शहर म्हणून राहुरीचा नावलौकिक वाढण्यासाठी नगरविकास खाते कमी पडणार नाही, राज्यात पक्षाने दिलेल्या जबाबदार्‍या व मंत्रिपदामुळे कोठेही असलो तरी राहुरी शहर ही माझी स्वतःची कर्मभूमी असल्याने मी त्या जनतेला कधीही विसरू शकत नसल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या