राहुरी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ

jalgaon-digital
2 Min Read

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राज्यातील अग्रगण्य असलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून 18 जागांसाठी 28 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. अर्ज भरण्यासाठी 27 मार्चपासून सुरुवात झाली आहे. 3 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने ही निवडणूक तनपुरे विरुद्ध विखे-कर्डिले गटात होणार असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

संचालक मंडळाची मुदत संपून बाजार समितीवर 24 एप्रिल 2022 पासून प्रशासकीय राजवट आहे. जिल्ह्यातील 14 बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यात राहुरी बाजार समितीचा समावेश आहे.

शुक्रवार 28 एप्रिल रोजी निवडणुकीसाठी मतदान व त्याच दिवशी मतदान संपल्यावर मतमोजणी होणार आहे. बाजार समितीच्या 18 जागेत सेवा सोसायटी मतदार संघात 11 जागा असून त्यात 7 जागा खुल्या प्रवर्गासाठी, 2 जागा महिला प्रवर्ग, 1 जागा इतर मागासवर्ग प्रवर्ग व 1 जागा एनटी प्रवर्गासाठी राखीव आहे.

ग्रामपंचायत मतदार संघातून 4 जागा निवडून द्यावयाच्या असून त्यात 2 जागा खुल्या प्रवर्गासाठी 1 जागा आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्ग व 1 जागा अनु. जाती जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. व्यापारी मतदार संघांसाठी 2 जागा आहेत. तर हमाल मापाडी मतदार संघ 1 जागा, असे एकूण 18 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. 1 जागा पणन मतदार संघांसाठी राखीव आहे.

यावेळी तनपुरे व विखे-कर्डिले दोन गटांत चुरस निर्माण झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीमुळे तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघणार असून 7 वर्षांपूर्वी राहुरी बाजार समितीची निवडणूक दोन गटांत होऊन विद्यमान सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तनपुरे गटाने बहुमत मिळवून वर्चस्व सिद्ध केले होते. विरोधी गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *