Friday, April 26, 2024
Homeनगर‘इरादे दोस्तीचे अन् मनसुबे कुस्तीचे’ डावपेच अन् पडद्यामागून हालचाली...

‘इरादे दोस्तीचे अन् मनसुबे कुस्तीचे’ डावपेच अन् पडद्यामागून हालचाली…

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यामध्ये 44 ग्रामपंचायतींची निवडणूक आता दुसर्‍या टप्प्यात आली आहे. मतदानासाठी अवघ्या 17 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे.

- Advertisement -

त्यामुळे गावपुढार्‍यांसह कार्यकर्ते आणि इच्छुकांच्या राजकीय डावपेचाला वेग आला आहे. काही गावांमध्ये बिनविरोध करण्याच्या हालचाली असल्या तरी ‘इरादे दोस्तीचे अन् मनसुबे कुस्तीचे’ अशी अवस्था बघायला मिळत आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी अद्याप एकाही गावाने पुढाकार घेतला नाही. दिवसेंदिवस इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून राहुरी तहसीलच्या प्रांगणात गावोगावच्या राजकीय कार्यकर्त्यांची जत्रा भरली आहे.

दरम्यान, प्रत्येक उमेद्वार हा किमान सातवी पास असावा, अशी अट राज्य शासनाने घातल्यामुळे अंगठेबहाद्दर उमेद्वारांची पंचाईत झाली असून एवढा ‘सुशिक्षित’ उमेद्वार कोठून आणावा? असा संभ्रम गावपुढार्‍यांसमोर पडला आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी, उंबरे, अंमळनेर, आंबी, बाभूळगाव, चांदेगाव, चेडगाव, चिंचाळे, चिंचविहीरे, दवणगाव, धानोरे, गणेगाव, गुहा, गुंजाळे, जांभळी, जांभूळबन, वावरथ, कनगर खुर्द, करजगाव, कात्रड, केंदळ बु., केसापूर, खडांबे बु., कोळेवाडी, कोपरे, शेनवडगाव, कुक्कढवेढे, कुरणवाडी, लाख, मल्हारवाडी, पाथरे खु, पिंपळगाव फुणगी, पिंप्री अवघड, राहुरी खुर्द, रामपूर, संक्रापूर, सात्रळ, तांभेरे, तांदूळनेर, तिळापूर, वडनेर, वळण, वांजूळपोई, वरशिंदे, वरवंडी या गावातील राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. दि. 23 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी गाव पुढार्‍यांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

राहुरी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीमध्ये 150 प्रभाग आहेत. मतदार केंद्र संख्या 167 इतकी असून 418 ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी पुरूष मतदार 48 हजार 739 इतके तर स्त्री मतदार 44 हजार 709 इतके आहे. एकूण 94 हजार 207 मतदारांच्या हाती 44 ग्रामपंचायतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार उमेदवारांना बँक खाते उघडावे लागणार आहे. 7 ते 9 सदस्य संख्या असणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला 25 हजार रुपयापर्यंत खर्च करण्याची सवलत आहे. 11 ते 13 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना 35 हजार तर 15 ते 17 सदस्य असणार्‍या ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना 50 हजारांचा खर्च करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

यासाठी प्रत्येक उमेदवाराला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नवीन खाते उघडण्याचे नियम आहेत. बँकांमध्ये जिल्हा बँकेच्या खात्यालाही मान्यता मिळाली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी होत असून जिल्हा बँकेने इच्छुक उमेदवारांचे खाते तात्काळ उघडून देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

तालुका पातळीवरील नेत्यांना ‘नो एन्ट्री’

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण निघणार असल्याने सरपंचपदाचे स्वप्न पाहणार्‍या इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. कोणत्या वार्डाचा सरपंच होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून काही गावात तर चक्क सरपंचपदासाठी बोली लागल्याची चर्चा होत आहे. विधानसभेसारख्याच याही निवडणुका होत असून अनेक गावात मात्र, त्या स्थानिक पातळीवरच लढविल्या जाणार आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर काही गावात पक्ष, संघटना आणि तालुका पातळीवरील नेत्यांना ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे. तर काही गावात तनपुरे आणि विखे-कर्डिले गटात लढती होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या