Saturday, April 27, 2024
Homeनगरराहुरी फॅक्टरीवर गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

राहुरी फॅक्टरीवर गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. मात्र, राज्य सरकारचा आदेश पायदळी तुडवून राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुटखा व मावा विक्री खुलेआम सुरू होती. दि.5 जून रोजी राहुरी फॅक्टरी परिसरात दोन ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

राहुरी फॅक्टरी परिसरातील अमिर शेख याच्या खोलीमध्ये आरोपी पोपटलाल भंडारी रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी हा महाराष्ट्र राज्य तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असलेली सुगंधी सुपारी व मसाला शरीरास अपायकारक होईल. तो खाण्यासाठी अपायकारक आहे. हे माहिती असून देखील त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला. पोलीस व पंच येण्याची चाहूल लागताच तो पळून गेला. त्याच्या आजूबाजूला नाव-गाव विचारले असता त्याचे नाव पोपटलाल भंडारी असल्याचे समजले. यावेळी त्या ठिकाणाहून हिरा पुडे व मावा बनविण्याची सुपारी व तंबाखू असा 6 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हवालदार सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरून पोपटलाल भंडारी याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. व कलम – 449/2021 भादंवि. कलम 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी कारवाई ही शेटीया (पूर्ण नाव माहीत नाही) रा. राहुरी फॅक्टरी याच्यावर करण्यात आली. फॅक्टरी परिसरातील साखर कारखाना कामगार वसाहत लाईन नं 5 खोली नं. 1 या ठिकाणी आरोपी शेटीया (पूर्ण नाव माहीत नाही) हा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करताना दिसून आला. पोलिसांनी छापा टाकल्याची चाहूल लागताच तोही पसार झाला. यावेळी त्या ठिकाणाहून गुटखा व मावा बनविन्याचे साहित्य असा 2 हजार 978 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हवालदार आजिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत शेटीया नामक इसमावर भादंवि. कलम 188, 272, 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवाईत एकूण 9 हजार 188 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा पुढील तपास हवालदार रवींद्र डावखर हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या