गणेश उत्सवात नियम मोडणार्‍या मंडळांवर कडक कारवाई – गायकवाड

राहाता |वार्ताहर| Rahata

गणेश मंडळांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा नियम मोडणार्‍या मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राहाता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत दिला आहे.

गणेश उत्सवानिमित्त राहाता शहर व परिसरातील गणेश मंडळांची शांतता कमिटीची बैठक नुकतीच पोलीस ठाण्यात संपन्न झाली. यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले, गणेश मंडळांनी पोलीस ठाण्याची परवानगी घेऊनच गणेश मूर्तीची स्थापना करावी. शासनाने घालून दिलेल्या नियमाचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करावे. गणेश मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी असून पारंपारिक वाद्य वाजवावे. मुदत दिलेल्या वेळेतच गणेशाचे विसर्जन करावे.

गणेश उत्सवात मंडळाच्या सदस्यांनी कुठल्याही प्रकारची गैरवर्तन करू नये. केल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. यावर्षी उत्कृष्ट गणेश देखावे करणार्‍या प्रथम 4 मंडळांना राहाता पोलीस स्टेशनच्यावतीने पारितोषिक जाहीर करण्यात येणार आहे. जनजागृती संदेश देणारे देखावे सादर करावे देखावे सादर करताना जातीय तेढ निर्माण होणार नाही याची प्रत्येक मंडळाने काळजी घ्यावी. अशा विविध सूचना यावेळी पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मंडळाच्या उपस्थित असलेल्या पदाधिकार्‍यांना केले.

मनसेचे विजय मोगले म्हणाले, उत्सवाच्या काळात मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी गणेश मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी एक होमगार्ड नेमणे आवश्यक आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे मनसे पालन करणार असून विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजणार असल्याचे मोगले यांनी सांगितले.

शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुन्ना सदाफळ म्हणाले, शहरातील मंडळांनी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवावे. शहरात हिंदू-मुस्लिम एकता आहे. दहीहंडी उत्सवात मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हे दाखवून दिले. गणेश उत्सवात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. मिरवणुकीत आदिवासी नृत्य तसेच जनजागृती होईल, असे उपक्रम राबवावे.

या बैठकीप्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, अस्तगावचे लोकनियुक्त सरपंच नवनाथ नळे, रामनाथ सदाफळ, राजेंद्र गांगुर्डे, दशरथ तुपे, सचिन अग्रवाल, सुलेमान शेख, गणेश निकाळे, राजेंद्र पाळंदे, मुश्ताक शहा, मौलाना रोप, इजाज शेख, राहाता पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक कदम व पोलीस कर्मचारी तसेच परिसरातील मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.