Wednesday, April 24, 2024
Homeनगरराहाता : खुल्या लिलावात व्यापार्‍यांत स्पर्धेमुळे सोयाबीनला 4 हजारांचा दर

राहाता : खुल्या लिलावात व्यापार्‍यांत स्पर्धेमुळे सोयाबीनला 4 हजारांचा दर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने आडत्यांना टाळून शेतमालाचा खुला लिलाव करण्याची नवीन पद्धत सुरू केलीय.

- Advertisement -

या नवीन पद्धतीला व्यापारी आणि शेतकर्‍यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आडत्यांचे दडपण आणि हस्तक्षेप नसल्याने सोयाबीनला सरासरी 3800 तर उत्तम प्रतीच्या सोयाबीनला 4000 रुपये क्विंटलने भाव मिळत असून इतर बाजार समितीच्या तुलनेत क्विंटलमागे 150 ते 200 रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यापूर्वी आडत्याच्या गाळ्यात माल उतरवून व्यापारी तेथे स्वतः लिलाव करत. त्यामुळे आडत्याला हस्तक्षेपाची संधी मिळत होती. आता आडत्याला टाळून शेतमालाचा थेट खुला लिलाव सुरू करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला असून दोन दिवसांपासून ही लिलावाची पध्दत सुरू करताच बाजारभावासाठी स्पर्धा दिसू लागली.

समितीचे दोन अधिकारी आणि तीन कर्मचारी सदर लिलाव करत असून व्यापारी आणि आडतदार लिलावात बोली लावत आहेत. बाजार समितीत 150 ते 200 अधिक दर मिळत असल्याने खुल्या बाजारातही व्यापार्‍यांना आता जास्तीचे दर द्यावे लागत आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. बाजार समितीत विकल्या गेलेल्या मालाला बाजार समितीचे कवच असल्याने शेतकर्‍यांना त्यांच्या विकलेल्या शेतमालाची रक्कम रोख मिळताना दिसून येते.

विशेष म्हणजे शेतकरी थेट वाहनात सोयाबीन मोकळी भरून आणत असून लिलावाच्या वेळी मालाची क्वालिटी समोर दिसते. बारदाना व हमालीचा मोठा खर्च वाचला जात असल्याने शेतकर्‍यांचा फायदा होताना दिसून येतो.

इतर बाजार समितीच्या तसेच खुल्या बाजाराच्या तुलनेत अधिक दर मिळत असल्याने शेतकरी देखील सुखावले आहेत. आडत नाही, इतर खर्च नाही आणि स्पर्धा वाढल्याने 150 ते 200 रुपये शेतकर्‍यांना जास्तीचे मिळत असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. तर व्यापारी देखील या निर्णयाचे स्वागत करतात.

चांगल्या प्रतीच्या मालाला चांगला दर यातून मिळणार असून शेतकर्‍यांची अडवणूक व फसवणूक थांबली जाईल. दोन दिवसांत या खुल्या लिलावामुळे बाजार समितीत आवक वाढू लागली असून बांधावर खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना माल देऊन फसवणूक होण्यापेक्षा बाजार समितीत माल विक्रीसाठी नेण्याचा शेतकर्‍यांचा कल वाढल्याचे बाजार समिती सचिव उध्दव देवकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या