Friday, April 26, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात कापूस उत्पादकांना सव्वा कोटीचा पीक विमा लाभ

राहाता तालुक्यात कापूस उत्पादकांना सव्वा कोटीचा पीक विमा लाभ

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील 871 कापूस उत्पादक शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 26 लाख रूपयांचा लाभ माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील 871 शेतकर्‍यांनी 2019-20 या आर्थिक वर्षांत 571 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केल्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. याच कालावधीत आलेल्या अतिवृष्टी आणि वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने पेरणी केलेल्या पिकाला धोका निर्माण झाला होता. महसूल आणि कृषी विभागाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन प्रस्ताव शासनाला पाठविला होता.

माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून विमा रकमेची रक्कम शेतकर्‍यांना तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार तालुक्यातील पाचही मंडळातील 871 शेतकर्‍यांना 1 कोटी 26 लाख 16 हजार रूपयांचा विमा मंजूर झाला असल्याचे आ.विखे यांनी सांगितले.

तालुक्यातील पुणतांबा मंडळातील 18 शेतकर्‍यांनी 27 हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड केली होती. नैसर्गिक संकटाचा तुरीच्या पेरणीलाही फटका बसला होता. या शेतकर्‍यांना सुध्दा विमा रक्कम मिळावी यासाठी आ. विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने 11 शेतकर्‍यांना 1 लाख 15 हजार 416 रूपयांची विमा रक्कम मंजूर झाली आहे. यापुर्वी तालुक्यातील सोयाबीन, मका उत्पादक शेतकर्‍यांना 30 कोटी 42 रूपयांचा लाभ आ. विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला होता.

आधीच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर सद्य परिस्थितीत करोनाचे मोठे आव्हान उभे राहिल्याने अर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतीच केंद्रीय कृषि मंत्री तोमर यांची भेट घेवून जिल्ह्यातील पंतप्रधान पीक विमा योजनेची रक्कम शेतकर्‍यांना तातडीने मिळावी म्हणून मागणी केली होती. पीक विमा योजनेचा लाभ मिळाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या