Thursday, April 25, 2024
Homeनगररब्बीच्या पेरण्यांनी ओलांडला पाच लाख हेक्टरचा टप्पा

रब्बीच्या पेरण्यांनी ओलांडला पाच लाख हेक्टरचा टप्पा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवकाळी पावसावर मात करत जिल्ह्यात धिम्या गतीने रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू आहेत. आतापर्यंत ऊस, कांदा यांच्यासह 5 लाख 2 हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात कांदा पिकाची लागवड ही विक्रमी 1 लाख 4 हजार 748 हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे. पेरणी कालावधीनंतरही ज्वारीची पेरणी झाल्याने ज्वारीचे क्षेत्र 1 लाख 75 हजार हेक्टरवर पोहचले आहे. जिल्ह्यात ऊस आणि कांदा पिकाशिवाय 2 लाख 85 हजार 121 हेक्टरवर (39 टक्के) पेरण्या झालेल्या आहेत.

- Advertisement -

यंदा परतीच्या पावसाच्या दणक्यामुळे रब्बी ज्वारीच्या पेरण्यांवर मोठा परिणाम झालेला आहे. मात्र, ज्वारी पेरणीचा 15 ऑक्टोबरचा कालावधी संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी झालेली आहे. ज्या शेतकर्‍यांची शेती विहीर बागायत अथवा पाण्याचे अन्य स्त्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी उशीराच्या ज्वारी पिकाच्या पेरणीला पसंती दिली आहे. यामुळे ज्वारीचे क्षेत्र 1 लाख 75 हजार 491 हेक्टरपर्यंत पोहचले आहे. दुसरीकडे गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र वाढत असून आतापर्यंत सरासरीच्या 40 हजार 801 हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे.

पेरणीची टक्केवारी 72 टक्के आहे. यासह हरभरा पिकाची पेरणी 53 हजार 772 हेक्टरपर्यंत पोहचली असून पेरणी टक्केवारी ही 35 टक्के झाली आहे. जिल्ह्यात अनेक भागात उशीर पेरणी झालेल्या ज्वारी पिकावर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिकटा या रोगाचा प्रार्दभाव झालेला दिसत आहे. यंदा अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकचे क्षेत्र कमी होवू शेतकरी कांदा पिकाकडे वळाले आहे. यामुळे कांदा पिकाची लागवड विक्रमी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 1 हजार 4 हजार 748 हेक्टरवर लागवड झालेली आहे.

झालेली पेरणी हेक्टरमध्ये कंसात टक्केवारी

ज्वारी 1 लाख 75 हजार 491 (37 टक्के), गहू 40 हजार 801 (72 टक्के), मका 14 हजार 766 (41 टक्के), हरभरा 53 हजार 772 (35 टक्के), करडई 46 (7 टक्के), ऊस लागवड 54 हजार 288 (53 टक्के), चारा पिके 43 हजार 390, कांदा 1 हजार 4 हजार 748, बटाटा 793, टोमॅटो 613, भाजीपाला पिके 8 हजार 738, मसाला पिके 99, औषधी, सुगंधी वनस्पती 24, फुलपिके 683 आणि फळपिके 3 हजार 503 हेक्टरवर पेरणी अथवा लागवड झालेली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत थंडीचा जोर वाढला आहे. असे असले तरी आकशात अभाळ दिसत असून यामुळे ग्रामीण भागात दिवसा देखील थंडी जाणवत आहे. वाढलेली थंडी ही गहू आणि हरभरा पिकाला पोषक असून येत्या काही दिवसांत थंडीत वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाला आहे. मात्र, वाढणारी थंडी आणि ढगाळ वातावरण हे कांदा पिकासाठी त्रासदायक असून कांदा पिकांवर औषधाचे फवारे मारताना शेतकरी दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या