Friday, April 26, 2024
Homeनगरखड्ड्यात जीव गेल्यावर मनपाला जाग येणार का?

खड्ड्यात जीव गेल्यावर मनपाला जाग येणार का?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. नागरिक, व्यापार्‍यांकडून विविध करांची नियमित वसुली करूनही त्यांना मुलभूत सोयी सुविधा देण्याकडे मात्र महापालिका दुर्लक्ष करत आहे. रस्त्यांच्याबाबत तर मनपा अधिकार्‍यांनी डोळ्यावर पट्टी बांधली की काय? अशी शंका उपस्थित करत कापड बाजार येथील सात फुटाच्या खड्ड्याला व्यापार्‍यांनी पुष्पहार अर्पण करून निषेध व्यक्त केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू जाधव, प्रणव बोगावत, कुणाल भंडारी, सुरेश राजपुरोहित, गणेश पुट्टा यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

- Advertisement -

शहरातील नागरिक, व्यापारी नियमितपणे महापालिकेचा कर भरतात. ज्यांची थकबाकी असते त्यांच्यावर मनपा प्रशासन कारवाई करते. गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरातील रस्त्यांची सर्वत्र चाळण झालेली पहायला मिळते. शहरातील एकही रस्ता खड्डेमुक्त नाही. याला जबाबदार मनपा प्रशासन नाही का? यांच्यावर कारवाई कोण करणार. सत्ताधारी याबाबत काहीही दखल घेत नाही. दिवस येतात जातात पण नगरकरांना काही खड्डेमुक्त रस्ते मिळत नाहीत.

एम.जी.रोड चौकात तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळसच झाला आहे. रस्त्याच्या मध्यभागी सात फुटांचा मोठा खड्डा पडला. मुख्य बाब म्हणजे या रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी असते. खड्डा जर कोणाला दिसला नाही आणि जर या खड्ड्यात पाय पडला तर त्याच्या जीवाचे काय होईल हे सांगता येत नाही. त्याकडेही मनपा लक्ष देत नाही. या सर्व बाबींना मनपा आयुक्त, अधिकारी, कर्मचारीच जबाबदार आहेत, असा आरोपही नागरिकांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या