Pushpa Bhave : आपल्या अमोघ वक्तृत्वाने समोरच्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रभावी वक्त्या

jalgaon-digital
3 Min Read

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका पुष्पा भावे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रा. पुष्पा भावे या सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड असणाऱ्या समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका समजल्या जात.

प्रा. पुष्पा भावे स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या, ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार, समांतर आणि स्वच्छ समाजनिर्मितीच्या राजकारणासाठी देखील भूमिका घेत सतत लढत राहिलेल्या लेखिका प्रा. पुष्पा भावे यांचे साहित्य-समाज आणि राजकीय चळवळीतील योगदान महत्वपूर्ण राहिले आहे.

त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, सतीश आळेकर या दिग्गजांना त्यांच्या नाटकांबद्दल पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असे.

विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या.

स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर पुष्पाताईंचा वैचारिक ठसा होता. आणीबाणीविरोधात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून जन्माला आलेल्या जनता पक्षाचे पुष्पाताईंनी तडफेने काम केले.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई पदाधिकारी होत्या.

२०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळ ठाकरे यांचे नाव देण्याला भावे यांनी उघडपणे विरोध केला होता. त्यांच्या मते, “बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला “बैलबाजार” असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर बाळ ठाकरे यांनी अनेक वेळा पु.ल. देशपांडे यांच्यावरही टीका केली होती`.

त्यांनी पु.ल.देशपांडे यांना ‘मोडका पुल’ असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणाऱ्या बाळ ठाकरे यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात”… असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *