Saturday, April 27, 2024
Homeजळगावजि.प.आरोग्य विभागाची चार कोटींची औषध खरेदी रखडली

जि.प.आरोग्य विभागाची चार कोटींची औषध खरेदी रखडली

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सध्या वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेशन, सर्दी, खोकला, तापची साथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. प्रत्येक घरात लहान बालकांसह वृध्दाला आरोग्याच्या समस्या उद्धभवल्या आहेत. मात्र, दुसरीकडे सर्वसामान्य नागरीक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी जात असतांना ग्रामीण प्रथमिक केंद्रांमध्ये औषधांचा साठा शिल्लक नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, याबाबत कानोसा घेतला असता जिल्हाभरात यंदा औषधांची खरेदी (Purchase of medicines) करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे 4 कोटींच्या औषध खरेदीला शासनाकडूनच प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने जिल्हा परिषदेच्या (Z.P.) आरोग्य केंद्रात (Health Department) औषधी खरेदीची प्रक्रिया रखडली आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यापासून सकाळी थंडी व दुपारी तापामानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे वातावरणात चढ-उतारामुळे बदल होत असल्याने ग्रामीण भागात सर्दी, खोकला, ताप अशी साथ सुरू झालेली आहे. ग्रामीण भागात अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे. सर्वसामान्य नागरिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात असतांना त्यांना खोकल्याचे सीरप, गोळ्या मिळत नसल्याची विदार परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयात जावून पदरमोड करुन औषधी खरेदी करावी लागत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांसाठी औषध पुरवठा करण्या साठी जिल्हा नियोजन मंडळाकडून 4 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

कोट्यावधीचा निधी देवून देखील औषध खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना काळात देखील जिल्हापरिषदेने औषध खरेदी वेळेत न केल्याने ही समस्या उद्धभवली होती. कोरोनाची लाट ओसल्यानंतर जिल्हा परिषदेने खरेदीचा सोपस्कार पुर्ण केला होता. आता, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साथ सुरू असतांना औषधी नसल्याने जिल्हा परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यातील मोजकेच वैद्यकीय अधिकारी वगळले तर बहुतांश आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकिय अधिकारी राहत नाही,काही ठिकाणी अपडाऊन करत असतात.

विषेश:त ओपीडी केली जात नाही. गेल्या आठवड्यातच जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी आरोग्य केंद्रांना भेटी देत आरोग्य यंत्रणेतील 22 कर्मचार्‍यांना नोटीसा बजावल्या होत्या. तसेच कठोर कारवाई होत नसल्याने ही आरोग्य केंद्रे रामभरोसे आहेत.

रुग्ण कल्याण समित्या कागदोपत्रीच

जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णकल्याण समिती गठीत करण्यात आली असून या समितीला औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर वैद्यकीय अधिकार्‍यांच्या दिरंगाईने कुठेही खरेदी केली जात नसल्याने रुग्ण वार्‍यावर आहेत. रुग्ण कल्याण समित्या कागदोपत्रीच आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. काही ठिकाणी वरिष्ठांकडून सूचना करून देखील औषध खरेदी करण्यात आली नसल्याची बाब जळगाव तालुक्यात समोर आली आहे.

4 कोटीला प्रशासकीय मान्यतेची जि.प.ला प्रतीक्षा

शासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांसाठी 4 कोटींच्या खरेदीला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. शासनाकडून टप्याटप्याने याला मान्यता दिली जात असून जळगाव जिल्ह्याच्या 4 कोटीला अजून प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. एकीकडे आरोग्याचा प्रश्न उद्धभवला असतांना जि.प.प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात मश्गुल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या