Saturday, April 27, 2024
Homeनगरसहायक पोलीस निरीक्षकासह चौघांना मारहाण

सहायक पोलीस निरीक्षकासह चौघांना मारहाण

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यातील अरणगाव परिसरात गावरान कोंबडी खरेदी करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकासह चौघेजण चारचाकी वाहनातून आले होते. यावेळी ग्रामस्थांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहन न थांबल्याने दुचाकीस्वारांनी वाहनाला दुचाकी आडवी घालून वाहन थांबवत जमलेल्या 20 ते 25 जणांनी या वाहनावर दगडफेक करत वाहनातील सहायक पोलीस निरीक्षकासह चौघांना बाहेर काढत मारहाण केली. याप्रकरणी जामखेड पोलिसांत खुनाच्या प्रयत्नासह 12 प्रकारचे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

याबाबत जामखेड पोलिसांत विशाल भानुदास कांबळे (रा. भीमनगर ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली, आष्टी तालुक्यातील पांडेगवहाण येथील वस्तीवर गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय असून खेडोपाडी जाऊन कोंबडी खरेदी करत असतो. शुक्रवार (दि.6) सायंकाळी साडेपाच वाजता जवळच असलेल्या अरणगाव व परिसरातून कोंबड्या खरेदीसाठी इंडिगो कारमध्ये (क्रमांक एम. एच. 06, 5503) भाऊ बुलढाणा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक किरण कांबळे, सासरे संजय विठ्ठल निकाळजे व सुनील निकाळजे यांच्यासमवेत खेडोपाडी गेलो होतो.

पण कोंबड्या न मिळाल्याने अरणगाव बसस्थानक येथे आल्यानंतर मोटारसायकलवरून डबलशीट आलेल्या इसमांनी कारला दुचाकी आडवी लावून शिवीगाळ करून आम्हाला गाडीतून खाली उतरण्यास धमकावले. यावेळी बाळासाहेब रावसाहेब मिसाळ, डॉ. सुरज रामकिसन जायभाय, राजू तुकाराम जायभाय, तुकाराम जायभाय, रामकिसन सोनबा जायभाय, मधुकर दत्तू जायभाय, शिवाजी जायभाय (पिकअप मालक), बबन भगवान दराडे, सतीश (पूर्ण नाव माहीत नाही) रा. वंजारवाडी व इतर 20 ते 25 जणांनी आमच्या गाडीवर मोठमोठे दगडे मारून काचा फोडल्या व बळजबरीने गाडीचे दरवाजे उघडून आम्हाला बाहेर खेचून त्यांच्या हातातील लोखंडी रॉड, बांबू, दगडाने व काठीने मारहाण केली.

त्यातील काहींनी आमच्या खिशातील 50 हजार रुपये हिसकावून घेऊन जबर मारहाण करत होते. माझा भाऊ किरण कांबळे हा सहायक पोलीस निरीक्षक असल्याचे सांगत होता, तरीही बेकायदा मंडळी मारहाण करत होती. यादरम्यान तेथे अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे व त्यांचे कार्यकर्ते आले व त्यांनी आम्हाला सोडवले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे शोधपथक आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, हा प्रकार मॉब लाँचींगचा नसल्याचे निरीक्षक गायकवाड यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या