Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरपुणतांब्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाचे श्रेय कोण घेणार - जाधव

पुणतांब्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाचे श्रेय कोण घेणार – जाधव

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

जागतिक बँकेच्या सहकार्याने जल स्वराज टप्पा 2 अंतर्गत पुणतांबा गावासाठी 17 कोटी रुपये खर्चाच्या पूरक पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले. या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे ग्रामस्थांनी उघड केले आहे. ह्याचे श्रेय कोण घेणार ? असा सवाल मनसेचे राहाता तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांनी केला आहे.

- Advertisement -

श्री. जाधव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 2018 पासून या पाणी योजनेचे काम सुरू आहे. तेव्हा पासून योजनेच्या मंजुरी तसेच पाठपुराव्या बाबत श्रेय वाद सुरू आहे.पाणीपुरवठा योजना कोणामुळे मंजूर झाली याची जाणीव पुणतांबेकरांना आहे. पाणीपुरवठा योजेनच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर जागतिक बँकेच्या धोरणानुसार योजनेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती महिला विकास समिती तसेच सामाजिक लेखा परिक्षण समितीची निवड करण्यात आली होती.

विशेष म्हणजे पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदासाठी ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला होता. योजनेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी समित्यांची भूमिका महत्त्वाची होती. असे असताना मागील वर्षी जून महिन्यात पहिल्याच पावसात साठवणुकीच्या तलावातील दगडी पिचिंग ढासळले होते तसेच बीमही वाकले होते. हे केवळ निकृष्ट कामामुळेच झाले.

याबाबत मनसेच्यावतीने आवाज उठविण्यात आला होता. तसेच माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निकृष्ट काम व गैरव्यवहाराबाबत लक्ष वेधले होते. पाणीपुरवठा योजनेत कोणाचीही संमती न घेता झालेल्या बदलांची माहिती दिली होती. गावातील काही नेत्यांनी या योजनेच्या चौकशीची मागणी केली होती. ना. पाटील यांनी तातडीने लेखी आदेशही दिले होते मात्र चौकशीचा अहवाल अद्यापही बाहेर आलेला नाही.

सध्या पाणीपुरवठा योजनेची चाचणी सुरु असतानाही अनेक ठिकाणी पाईप मधून गळती होण्याचे प्रकार झाले आहेत. एकूणच पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पहिल्या योजनेतील निकृष्ट काम व गैरव्यवहार झाकण्यासाठी दुसर्‍या योजनेअंतर्गत निधी मंजूर केला की काय? अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणत्या कामावरून पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेण्याचा कोणी केविलवाणा प्रयत्न करत असेल तर ग्रामस्थांना नेमकी वस्तुस्थिती माहीत आहे. याची आपण पोलखोल करणार असल्याचे श्री. जाधव यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या