Saturday, April 27, 2024
Homeनगरपुणतांबा ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणांचे संकेत

पुणतांबा ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणांचे संकेत

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा-रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत नवनवीन व धक्कादायक राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्याच्या जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय पटलावर ही समीकरणे पुढे आली व यशस्वी झाली तर त्याचा फटका सत्तेची महत्त्वाकांक्षा असणार्‍या राजकीय नेत्यांना बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

निवडणूक म्हटले की, स्थानिक पातळीवर दुरंगी किंवा तिरंगी लढत व काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करून सत्तेसाठी व मतासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडवून मतदारांना आकर्षित करून आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मतदान होईपर्यंत केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा असते. निवडणूक निकाल लागल्यानंतर किमान पाच वर्षे मतदारांकडे कोण किती लक्ष देते हे सर्वश्रूत आहे. शेतकरी संपाचे गाव समजल्या जाणार्‍या पुणतांबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावेळी मतदार व काही राजकीय नेत्यांचा कल बघता निवडणुकीत वेगळेपण दिसले जाण्याची शक्यता आहे. यावेळीही सरपंचाची निवड थेट जनतेतून आहे.

सहा प्रभागांतून 17 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. सरपंच पद आरक्षित असल्यामुळे उपसरपंच पदावर आतापासूनच सर्वांचे लक्ष आहे. स्थानिक पातळीवर पक्ष व पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली जात नाही. सोयीनुसार पॅनेल उभे केले जातात. एखाद्या राजकीय नेत्याचा फोटो लावून आशीर्वाद घेतले जातात व निवडणूक जिंकण्यासाठी सर्व तंत्राचा वापर करून सत्ता हस्तगत केली जाते. पुणतांबा-रास्तापूर ग्रामपंचायत निवडणुकीत काहींनी प्रथमच स्वंतत्र पॅनेल उभे न करता ज्या-ज्या प्रभागात ज्यांचे प्राबल्य आहे त्यांनी त्या प्रभागातील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

तसेच सरपंच पदासाठी मतदारांचा कल विचारात घेऊन उमेदवाराची निवड करावी व वेळप्रसंगी अपक्षांची आघाडी करून निवडणूक रिंगणात उभे राहावे, अशी प्राथमिक पातळीवर चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे एकाच पॅनेलला पॅनेलप्रमुख म्हणतील तसे मतदान करावे हा नेहमीचा पारंपरिक दृष्टीकोन असला तरी पुणतांब्याचे सूज्ञ व जागरूक मतदार निवडणूक चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच वेगवेगळ्या बाबींचा विचार करून त्याचे आतापासून समीक्षण करण्याच्या मानसिकतेत आहेत.

विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर असणार्‍या ज्वलंत प्रश्नावरच जास्त लक्ष केंद्रीत करून दिल्लीच्या मुख्यमंत्र्या सारखा वीज पाणी फुकट सारखा लोकप्रिय नारा हाती घेऊन मतदारांना साद घालण्यात येणार आहे. त्यामुळे 5 वर्षांत कायापालट, विकासाचे मॉडेल, आदर्श गाव, खेडे या निवडणुकीपुरत्या वापरलेल्या घोषणा तसेच आश्वासनांची खैरात याकडे कानाडोळा होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त उमेदवार उभे करून लोकशाही जिवंत असल्याचेही दाखवून देण्यात येणार आहे. निवडणुकीत उभे राहण्यासाठी आगोदर ग्रामपंचायतीची थकबाकी पूर्ण भरावी लागते. परस्पर थकबाकी संबंधित पॅनेलप्रमुख कशी भरतील यासाठी इच्छुक उमेदवारांना गावातील काही जुने जाणकार तसेच ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. प्रभागातील मतदारांनी आग्रह केला तर योग्य व हुशार उमेदवारांसाठी वेळप्रसंगी लोकवर्गणी गोळा करण्यात येणार आहे.

मागील निवडणुकीत सरपंच पदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते व चार पॅनलमध्ये लढत होती. यावेळेस वेगळे चित्र असावे,असा दृष्टीकोन बळावत आहे. गेल्या अनेक वर्षात अनेकांनी ग्रामपंचायतीच्या सत्तेचा उपभोग घेतला आहे. मात्र गावाचा नेमका किती विकास झाला आहे, 24 तास पिण्याचे पाणी मिळणार का? रस्त्यांची अवस्था व इतर सेवा सुविधा किती चांगल्या उपलबध झाल्या आहेत याचा ताळेबंद मतदार राजाकडे आहे. त्यामुळे वास्तवतेचे भान ठेऊन या निवडणुकीत मतदार कसा निर्णय घेऊ शकेल याबाबत राजकीय विश्लेषकांनी अंदाज बांधले आहेत. त्यानुसार रणनिती ठरविली जात आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून गावातील वेगवेगळ्या भागांत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अनेकांना उमेदवारीचे आश्वासन दिले जात आहे. येत्या काही दिवसांत निवडणूक मोर्चेबांधणीला वेग येण्याची शक्यता आहे. असे असले तरी यावेळची ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होण्याची अटकळ मतदारापासून ते सर्वच गटाच्या तसेच पक्षाच्या नेत्यांनी बांधली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या