Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा झटका

पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा झटका

दिल्ली l Delhi

राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाजपला पंजाबमध्ये जोरदार फटका बसला आहे.

- Advertisement -

पंजाब राज्यात पार पडलेल्या स्थानिक संस्था निवडणूकमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कृषी कायद्यांना पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा असलेला कडवा विरोध मतपेटीतूनही झळकला आहे. भाजप अगदीच बाहेर फेकला गेला आहे. आम आदमी पार्टीसुद्धा अनेक ठिकाणी चीत झाली आहे. अकाली दल दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनून समोर आला आहे. पंजाबमधील स्थानिक संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळवत सहा महानगरपालिकेवर सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसने मिळवलेल्या या विजयामुळे निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. तर मोहाली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल गुरुवारी येणार आहेत.

काँग्रेस पक्षाने पंजाबमधील मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठानकोट, बटाला आणि भठिंडा मनपा निवडणुकीत विजय मिळवला आहे. बठिंडा मनपामध्ये काँग्रेस पक्षाने तब्बल ५३ वर्षांनी विजय मिळवला आहे.

हा निकाल भाजपासाठी खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कारण भाजपाकडे शहरी मतदारांचा पक्ष म्हणून पाहिलं जात होतं. पण कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शिरोमणी अकाली दलने युती तोडल्यापासून चित्र बदलल्याचं दिसत आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण ९२२२ उमेदवार मैदानात होते. निवडणुकीत सर्वात अधिक २,८३१ उमेदवार हे अपक्ष होते. तर काँग्रेस पक्षाने सर्वाधिक २०३७ उमेदवार उभे केले होते. भाजपने केवळ १००३ उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या वेळी भाजपने शिरोमणी अकाली दल या मित्रपक्षाशिवाय आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. शिरोमणी अकाली दलाने १५६९ उमेदवार मैदानात उतरवले होते. १४ फेब्रुवारीला १०९ नगपालिका, नगर पंचायत आणि सात महापालिका निवडणुकीसाठी मतदान झालं. कृषी कायद्यांवरुन आक्रमक आंदोलन सुरु असताना एकूण ७१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या