Friday, April 26, 2024
Homeक्रीडाPBKS vs MI : पंजाब किंग्जसमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान

PBKS vs MI : पंजाब किंग्जसमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान

अबू धाबी | Abu Dhabi

आयपीएल २०२१ मध्ये (IPL 2021) आज मंगळवारी दुसरा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात अबूधाबीच्या शेख झायद मैदानावर खेळवण्यात येणार आहे…

- Advertisement -

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. बाद फेरीच्या शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना ही शेवटची संधी आहे.

पंजाब किंग्ज (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) संघाच्या खात्यात १० सामन्यांमध्ये ४ विजय आणि ६ पराभवांसह ८ गुण आहेत. बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघाना आपले ४ सामने जिंकावे लागणार आहेत.

पंजाब संघाने दुसऱ्या हाफमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR) झालेल्या संघर्षपूर्ण लढतीत अखेरच्या षटकात २ धावांनी पराभव पत्करल्यानंतर सनराईझर्स हैद्राबादविरुद्ध (SRH) सामन्यात अखेरच्या षटकात ५ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला होता.

आता मुंबईला नमवून बाद फेरीच्या शर्यतीत आपले स्थान बळकट करण्याचा पंजाबकिंग्ज संघाचा मानस आहे. तर दुसरीकडे डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाची वाट अधिक खडतर झाली आहे.

बाद फेरीत दाखल होण्यासाठी मुंबईला आपले सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. कारण मुंबई संघाची धावगती इतर संघांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

दोन्ही संघांमध्ये अनेक आक्रमक आणि अनुभवी फलंदाज असल्यामुळे एक काटे की टक्कर आयपीएल चाहत्यांना पाहायला मिळण्याची संधी आहे. आयपीएल २०२० मध्ये अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात मुंबईने पंजाबला पराभूत केले होते.

तर दुबईमध्ये (Dubai) गतवर्षी झालेल्या सामन्यात डबल सुपर्ण ओव्हर लढतीत पंजाबने मुंबईवर मात केली होती, तर आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात चेन्नई येथे झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईला हरवले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज आहे.

पंजाब संघासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे सलामीवीर यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल, मयंक अगरवाल चांगली फ़लंदाजी करत आहेत. मात्र क्रिस गेल, निकोलस पुरण यांच्याकडून मोठी खेळी संघाला अपेक्षित आहे.

पंजाब संघासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहंमद शमी, आर्षदिपसिंग, रवी बिष्णोई फॉर्मात आहेत. आता मुंबईविरुद्ध अशीच कामगिरी करण्यासाठी राहुल अँड कंपनी सज्ज आहे.

मुंबई संघाबद्दल बोलायचे झाल्यास रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक वगळता उर्वरीत एकाही फलंदाजाला आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरान पोलार्ड आणि हार्दिक पांड्या बंगळुर संघाविरुद्ध झटपट बाद झाल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला ५४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवातून सावरण्यासाठी पंजाबविरुद्ध मुंबई संघ काय रणनीती आखतो? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

मुंबई संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, एडम मिल्ने चांगली गोलंदाजी करत आहेत. मात्र राहुल चाहर आणि कृणाल पंड्या गोलंदाजीत आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करणे आवश्यक असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या