Friday, April 26, 2024
Homeजळगावजि.प. सीईओंंचे अतिरीक्त चार्ज देण्याच्या अधिकाराला डच्चू

जि.प. सीईओंंचे अतिरीक्त चार्ज देण्याच्या अधिकाराला डच्चू

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा अतिरीक्त कार्यभारचा चार्ज देण्याचा अधिकार शिक्षण आयुक्त यांना देण्यात आला आहे.

- Advertisement -

तर उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा अतिरीक्त कार्यभार चार्ज देण्याचा अधिकार शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आला आहे. तसा जीआर पुणे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी 14 मे रोजी जारी केला आहे. त्यामुळे या जीआरनुसार जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे अतिरीक्त चार्ज देण्याच्या अधिकाराला डच्चू मिळाला आहे.

जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्यासह विविध विभागातील विभागप्रमुख यांच्या सेवानिवृती किंवा बदलीमुळे त्या जागा रिक्त असल्या तर त्याठिकाणी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना त्या संबंधित जागांवर अतिरीक्त पदभार देण्याचे अधिकार शासनाने दिले होते. मात्र, बहुतांश ठिकाणी सेवा ज्येष्ठतेनुसार अधिकारी आणि कर्मचार्‍यांना अतिरीक्त पदभार देण्यात डावलण्यात येत असल्याच्या तक्रारी वरिष्ठस्तरावर वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पुणे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचे संबंधित जिल्हा परिषदेला आदेश निर्गमित केले आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981 मधील नियम 56 नुसार शासकीय कर्मचार्‍यांकडे त्यांच्या स्वतःच्या पदाव्यतिरीक्त दुसर्‍या पदाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात येतो. असा हा दुसर्‍या रिक्त असलेल्या पदाचा अतिरीक्त भार, कार्यभार, एकाच प्रशासकीय विभागांतर्गत, प्रशासकीय सोय व निकड लक्षात घेवून शक्यतो. त्याच कार्यालयातील, त्याच संवर्गातील सर्वात ज्येष्ठ, अनुभवी व कार्यक्षम अधिकारी, कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात यावा, असे निर्देश आहेत.

जेथे असे अधिकारी, कर्मचारी उपलब्ध नसतील तेथे संबंधित पदाला लगत असलेल्या निम्न संवर्गातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांना अतिरीक्त कार्यभार देण्यात यावा. काही बाबींमुळे सर्वात ज्येष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना डावलून नंतरच्या व्यक्तीला अतिरीक्त कारभार द्यायचा असेल तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती अतिरीक्त कार्यकाभारासाठी का अपात्र आहे? त्याची लेखी कारणे नमूद करणे आवश्यक आहे. तथापि क्षेत्रिय स्तरावरुन अतिरीक्त कार्यभार सोपवतांना उपरोक्त परिपत्रकानुसार कार्यवाही होतांना दिसून येत नाही. यास्तव अतिरीक्त कार्यभार सोपविण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

शिक्षण सहसंचालक, विभागीय अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय सचिव, शिक्षणाधिकारी (सर्व) या पदाच्या सेवानिवृत्तीमुळे अथवा रजेच्या कालावधीत अतिरीक्त कार्यकाभार शासन तसेच शिक्षण आयुक्तांकडून सोपविण्यात येईल. विभागीय सहसचिव, सहा. सचिव या पदाचा अतिरीक्त कार्यभार पुणे माध्यमिक उच्च शिक्षणमंडळ यांच्याकडून सोपविण्यात येईल. तसेच उपशिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथक (प्राथमिक व माध्यमिक) तसेच गट ब या संवर्गातील सर्व पदांचा सेवानिवृत्तीमुळे अथवा रजेच्या कालावधित अतिरीक्त कार्यभार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालाकडून सोपविण्यात येईल,. असे आदेश महाराष्ट्र राज्य, पुणे शिक्षण आयुक्त विशाल सोळुंकी यांनी 14 मे रोजी निर्गमित केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या