Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री संजय राठोड अडचणीत

मंत्री संजय राठोड अडचणीत

मुंबई –

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने

- Advertisement -

खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले असून प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

बीड येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणात दहापेक्षा अधिक ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. भाजपनेही आक्रमक होत मंत्री राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर आता संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण, या आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोपांची महाराष्ट्र पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्समध्ये नेमका कोणाचा आवाज आहे याची सत्यता तपासण्याचे काम बीड पोलीस आणि सायबर सेलचे अधिकारी करणार आहेत. या ऑडिओ क्लिप्सची सत्यता तपासण्यात येईल आणि आवाज ओळखण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे या ऑडिओ क्लिप्स पाठवण्यात येणार आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येणारी माहिती आणि फॉरेन्सिक अहवालातून समोर येणार्‍या माहितीच्या आधारे पुढील कारवाई होणार आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी एका मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी रात्री भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले होते. मात्र, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नावं घेणं टाळलं आहे.

सत्य जनतेसमोर येईल

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी व्यवस्थित चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. त्यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई होईल, असं त्यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या