लोकनियुक्त सरपंच राऊत यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर

jalgaon-digital
5 Min Read

घुलेवाडी |वार्ताहर| Ghulewadi

संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणार्‍या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचाविरोधात सदस्यांनी दाखल केलेल्या व मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाबाबत काल दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी अविश्वास ठरावाबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील आदेशानुसार विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या विशेष ग्रामसभेनंतर झालेल्या मतदान प्रक्रियेत ठरावाच्या बाजूने 1184 मते तर 1015 मते ठरावाच्या विरोधात पडली. त्यामुळे अविश्वास ठरावाचे पारडे 169 मतांनी जड भरल्याने लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.

लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानंतर गेल्या 5 जुलैला विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यात उपस्थित 17 सदस्यांसह सरपंचांचे मतदान घेतल्यानंतर ठरावाच्या बाजूने 16 मते पडल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आल्यानंतर काल घुलेवाडीतील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

संगमनेर शहरालगतच असलेली घुलेवाडी ग्रामपंचायत महसुलाच्या बाबतीत तालुक्यात श्रीमंत समजली जाते. घुलेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विविध सहकारी व शैक्षणिक संस्था आहेत. घुलेवाडीत संगमनेर शहरातील विस्तारीत वसाहतींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून तालुक्याच्या राजकारणात घुलेवाडीला महत्त्व आहे. या ग्रामपंचायतीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेहमीच वर्चस्व राहिले होते. मात्र थेट जनतेतून निवडून येत सोपान राऊत यांनी वर्चस्वाला छेद दिला होता.

मागील मोठ्या कालावधीपासून घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्याविरोधात सदस्यांमध्ये खदखद सुरू होती. त्याचे पर्यवसान अविश्वास ठराव आणण्यात झाले. त्यानुसार 5 जुलैला अध्यासी अधिकारी तथा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली घुलेवाडी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेला 17 सदस्यांसह सरपंच उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठरावाच्या नोटीसमध्ये नमूद मुद्द्यांवर सर्वांची मते जाणून घेण्यात आली. सरपंच सोपान राऊत यांनीही आपली बाजू मांडली. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी 16 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने तर अवघ्या दोघांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. ठरावाच्या बाजूने तीन चतुर्थांशपेक्षा अधिक मते असल्याने सदरचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आल्याने विशेष सभेचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला होता. त्यांच्या आदेशानुसार काल (ता.13) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार घुलेवाडीच्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळी 10.30 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ग्रामसभेत ठरावाच्या बाजूने व विरोधात असे दोन्ही मतप्रवाह असल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी मतदारांना सविस्तरपणे माहिती दिली. मतदान प्रक्रिया दुपारी 02:45 वाजता पूर्ण झाली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच दुपारी 03 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. एकूण मतदार 13 हजार 763 आहेत. एकूण 2292 मतदान झाले. त्यात अविश्वास ठरावाच्या बाजूने 1 हजार 184 तर ठरावाच्या विरोधात 1 हजार 15 मते पडली. 93 मते अवैध ठरली. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्यावरील अविश्वास ठराव 169 मतांनी मंजूर झाला आहे.

सदर बाबतीत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार याचिकेच्या निकालास अधीन राहून आजच्या विशेष ग्रामसभेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे, असे तहसीलदार श्री. निकम यांनी जाहीर केले.

सकाळी 10.30 वाजता मतदान स्थळी गेट बंद केल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. तर मतदान प्रक्रिया राबविताना केवळ सहा खोल्या आरक्षित केल्या होत्या. मतदारांची गर्दी झाली. रांगेत कंटाळून तर काहींना यादीत नाव न सापडल्याने मतदार निघून गेले तर काहींना गेटमधून आत घेण्यात आले नाही. करोनाचे संकट डोक्यावर असल्याने प्रशासनाकडून कुठहीली व्यवस्था त्याठिकाणी केल्याचे दिसून आले नाही. करोनाच्या भितीनेही अनेकांनी मतदानाकडे पाठ फिरविली. करोना काळात अशी मतदान प्रक्रिया का राबविण्यात आली? असाही सवाल अनेकांनी केला.

मतदान प्रक्रियेवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

घुलेवाडीच्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला. त्यामुळेच मी सरपंच झालो. त्यांच्या मी कायमच ऋणात राहील. आजही या मतदान प्रक्रियेला सामोर जाताना जनतेचा विश्वास घेऊनच गेलो. अत्यंत कमी मतांवरुन माझ्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. जनतेचा कौल मान्य आहे. आगामी काळात ग्रामस्थांच्या पाठबळावरच एखाद्या पक्षात जाऊन जनतेची कामे करणार आहे.

-सोपान राऊत, लोकनियुक्त सरपंच

नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी घुलेवाडी ग्रामपंचायत, लोकनियुक्त सरपंचांना प्रशासकीय अनुभव नसल्याने विविध योजना, निधी, महसूल यावर प्रभावी काम करता आले नाही, त्यांनी गांभीर्याने कोणतेही काम केले नाही, ही खदखद सदस्यांमध्येही होती. व्यक्ती म्हणून ते खूप चांगले आहेत. मात्र प्रशासकीय पातळीवर काम करताना ते कमी पडले असे दिसून आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला.

-सिताराम राऊत, जि. प. सदस्य, घुलेवाडी

सरपंच सोपान राऊत यांना थेट जनतेने निवडून दिलेले असल्याने जनसामान्यांचा मोठा कौल त्यांना मिळाला. मात्र घुलेवाडीमध्ये असलेल्या विविध संस्थांचे कर्मचारी मतदारांच्या आवतीभोवती असल्याने ठरावाच्या बाजूने जास्त मते पडली असावी, अशीही चर्चा मतदान प्रक्रियेचे ठिकाणी होत होती. सरपंचाच्या विरोधात मोठी यंत्रणा कामाला लावूनही मोठ्या मतांचा फरक पडला नसल्याचे मतदान प्रक्रियेतून स्पष्ट होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *