Thursday, April 25, 2024
Homeजळगावमहामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची जनसुनावणी घेणार - ना.पाटील

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची जनसुनावणी घेणार – ना.पाटील

जळगाव । Jalgaon

जळगाव शहरात सुमारे 10 किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या नियंत्रणात सुरु असलेल्या या कामाविषयी प्रचंड तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन लवकरच जनसुनावणी घेणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केली. देशदूतच्या वर्धापनदिनानिमित्त सस्नेह भेट प्रसंगी मंत्री पाटील यांच्याशी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व समातंर रस्ते कृती समितीच्या सदस्यांनी संवाद साधला. त्यावेळी सद्यस्थितीत सुरु असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाविषयी अनेक तकारी करण्यात आल्या. त्यावर मंत्री पाटील यांनी जनसुनावणी घेण्याचे सांगितले.

- Advertisement -

‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने, समातंर रस्ते कृती समितीचे सदस्य मल्टीमिडिया फिचर्स प्रायव्हेट लिमीटेडचे सुशील नवाल, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, आशा फौंडेशनचे प्रमुख गिरीश कुळकर्णी, मणियार बिरादरीचे प्रमुख फारुख शेख, युवाशक्ती फाऊंडशनचे अमित जगताप, उमाकांत जाधव, प्रितम शिंदे, डॉ.गोपी सोरडे अशा अनेकांनी मंत्री पाटील यांचे चौपदरीकरणातील सदोष कामकाजाविषयी लक्ष वेधले.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम झंडू कंपनीने घेतले आहे. त्याचा प्रकल्प अभियंता कामावरुन पळून गेला आहे. त्यामुळे कामाची गती रेंगाळली असून आराखड्याला बाजुला सारून काम केले जात आहे, अशी तक्रार यावेळी करण्यात आली. त्याचे उदाहरण म्हणून रस्ता दुभाजकाचे काम परस्पर बदलून टाकल्याचे सांगण्यात आले. यावेळी असाही मुद्दा मांडला गेली की, रस्त्याचे भराव, त्यावरील खडी, कच आणि डांबरीकरणाचा पृष्ठभाग याचे प्रमाणही आराखड्यानुसार नाही. त्यामुळे रस्यावर खड्डे तयार होत असून त्याच्या दुरुस्तीचे कामही निकृष्ट आहे.

यावेळी अशीही तक्रार करण्यात आली की, इच्छादेवी मंदिराच्या पुढील भागात अंडरपास देणे आवश्यक आले. कामाच्या मूळ आराखड्यात आणि एकूण खर्चाच्या 10 टक्के बदल करता येणे शक्य आहे. त्यामुळे एकूण 120 कोटींच्या कामात वाढीव खर्च 12 कोटींपर्यंत होऊ शकतो. त्यामुळे रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ (सालारनगर) एक वाढीव अंडरपास द्यायला हवा.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यामुळे महामार्ग लगत इमारतींचे बांधकाम करताना आता राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकार्‍यांची एनओसी लागते आहे. या एनओसीसाठी अर्थिक व्यवहार होत असल्याचीही तक्रार करण्यात आली. शिवाय सध्या केलेल्या कामाची गुणवत्ता तपासणी योग्य त्या अधिकारी वर्गाकडून करुन घेण्याची विनंती मंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली.

सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर मंत्री पाटील म्हणाले की, या कामाबाबत मी जळगावकरांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेणार आहे. दोन तीन दिवसात वेळ जाहीर करुन जनसुनावणीची जागा जाहीर केली जाईल. तेथे महामार्गाच्या कामाविषयी सर्व तक्रारी ऐकून घेतल्या जातील. या संदर्भात देशदूतने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

ठेकेदाराचा अभियंताच पळाला

मंत्री पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर समांतर रस्ते कृती समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या कामाचे ठेकेदार झंडू कंपनीचे आहे. मात्र त्यांचा देखरेख करणारा अभियंता हा दोन-तीन प्रमुख माणसांसह पळून गेला आहे. त्यामुळे कामाची गती मंदावली आहे. रस्ता दुभाजकाच्या कामात परस्पर बदल केला आहे. मात्र तेथे लोखंडी जाळी लावायची आहे. या कामाची गुणवत्ता खराब असेल तर त्याची दखल घेत आहोत. कामाच्या गुणवत्तेविषयी तक्रार आली तर ठेकेदाराला समज दिली जात आहे. मी सध्या जळगावच्या बाहेर असल्यामुळे मलाही कामाची नेमकी प्रगती माहिती नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या