Friday, April 26, 2024
Homeनाशिकमनपाच्या क्रीडा स्पर्धांसाठी प्रस्ताव सादर

मनपाच्या क्रीडा स्पर्धांसाठी प्रस्ताव सादर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील दोन वर्षानंतर नाशिक महापालिकेच्या अधिकारी तसेच सेवक त्याचप्रमाणे त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी भव्य क्रीडा स्पर्धांचे ( NMC Sports Cometitions ) आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (NMC Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांना सादर करण्यात आला आहे.

- Advertisement -

आयुक्तांनी हिरवा झेंडा देताच चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या स्पर्धा होणार असल्याचे समजते. दरम्यान, क्रीडा स्पर्धांसाठी तब्बल 50 लाख रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.

नाशिक महापालिकेत अधिकारी तसेच सेवक असे मिळून सुमारे दोन हजार पेक्षा जास्त लोक आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या परिवारातील सदस्य यांची संख्या जोडली तर आकडा 5 हजाराच्या पुढे जाणार आहे. शहराचा झपाट्याने विकास होत आहे. नवनवीन ठिकाणी लोकवस्ती तयार होत आहे, अशा वेळेला महापालिकेच्या वतीने त्यांना विविध प्रकारच्या सुविधा देण्यात येतात.

मात्र मागील 24 वर्षापासून नाशिक महापालिकेत नोकर भरती झालेली नाही. यामुळे जे अधिकारी तसेच सेवक आहेत त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा देखील ताण आहे. अशा वेळेला कामाचा ताण कमी करण्यासाठी तसेच आपल्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीने दरवर्षी महापालिकेच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यासाठी अर्थसंकल्पात देखील वेगळी तरतूद करण्यात येते.

यंदाही 50 लाख रुपयांची तरतूद क्रीडा स्पर्धांसाठी करण्यात आलेली आहे.मागील दोन वर्षात करोनामुळे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद होते, म्हणून क्रीडा स्पर्धा घेता आल्या नाहीत. यंदा सर्व प्रकारच्या स्पर्धा खुल्या पद्धतीने होत असल्यामुळे मनपाच्या स्पर्धा व्हाव्यात, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

आयुक्तांनी परवानगी दिली तर या महिन्याच्या शेवटी या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा तसेच रांगोळी आदी स्पर्धा होणार आहे. त्याचप्रमाणे क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आदी खेळांचे आयोजन या क्रीडा स्पर्धांमध्ये होणार आहे.

जागेचा शोध सुरू

महापालिकेच्या अधिकारी तसेच सेवक व त्यांचे परिवारातील सदस्यांसाठी भव्य क्रीडा स्पर्धाचे आयोजन होणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने जागेचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद असलेला 50 लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.यामध्ये प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र तसेच स्पर्धा जिंकणार्‍यांना बक्षीस, प्रत्येकाला टी-शर्ट, चहा-नाश्ता यासाठी निधी वापरण्यात येणार आहे.

कामगार कल्याण अंतर्गत नाशिक महापालिकेच्या वतीने अधिकारी तसेच सेवकांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच कामाचा ताण हलका व्हावा, या दृष्टीने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे. डान्स, गायन स्पर्धा तसेच कविता वाचन देखील होणार आहे.

डॉ. दिलीप मेनकरउपायुक्त, मनपा नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या