Friday, April 26, 2024
Homeनाशिकप्राध्यापकांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण!; यूजीसीने प्रस्तावित केला आठ आठवड्यांचा वर्ग

प्राध्यापकांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण!; यूजीसीने प्रस्तावित केला आठ आठवड्यांचा वर्ग

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

पारंपारिक अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांना तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता यासह डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचेही प्रशिक्षण मिळायला हवे. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्राध्यापकांसाठी खास “मेंटॉरशिप ऑफ टीचर्स इन नॉन टेक्‍निकल स्ट्रीम’ या आठ आठवड्यांच्या प्रशिक्षण वर्गाची निर्मिती केली आहे. हे प्रशिक्षित प्राध्यापक इतर प्राध्यापकांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहेत.

- Advertisement -

शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विविध योजना आखण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्राध्यापकांच्या प्रशिक्षणावर देखिल भर देण्यात आला आहे. प्रादेशिक भाषांतून शिकविण्याचा क्षमता विकसित करण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण मोहीम, नॅशनल एज्युकेशन टेक्‍नॉलॉजी फोरम स्थापन करण्याची तरतूद या धोरणात असल्याने प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे.

या हेतूने पारंपारिक अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘यूजीसी’ने प्रा. एस. सी. पांडे यांच्या समितीने प्रशिक्षणासाठीच्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्याचा मसुदा ‘यूजीसी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. त्यावर हरकती सूचना नोंदविण्यासाठी येत्या सहा फेब्रुवारी पर्यंत मुदत दिली आहे. समितीने प्रस्तावित केलेल्या मसुद्यात प्राध्यापकांना आठ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

यामध्ये मूलभूत संवाद कौशल्ये, अध्यापन, संशोधन आणि नवकल्पना, प्रकल्प नियोजन आणि व्यवस्थापन, व्यवसायावर आधारित संशोधन, पेटंट, संस्थात्मक व्यवस्थापन आणि उद्योजकता, उदयोन्मुख अध्यापन पद्धती, अध्ययन विश्‍लेषण, अभ्यासक्रम निर्मिती, व्हर्च्युअल शिक्षण, डेटा विश्‍लेषण, कृत्रिम बुद्धिमता आणि यंत्रशिक्षण, हरित व शाश्‍वत तंत्रज्ञान अशा घटकांचा प्रशिक्षणात समावेश केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या