Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉगकाँकर्डच्या भूमीवर शिवरायांचा गनिमीकावा..

काँकर्डच्या भूमीवर शिवरायांचा गनिमीकावा..

आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करण्याची संधी जनरल गेजला सोडायची नव्हती. त्याने आपल्या सैनिकांना काँकर्डकडे कूच करण्याचे आदेश दिले. ब्रिटिश सैन्य ज्याला रेडकोटकिंवा डेव्हिसम्हणून ओळखल्या देखील ओळखले जायचे,त्याची एक छोटी तुकडी काँकर्डकडे निघाली.

मेजर जॉन पिटकायरिन हा काँकर्ड मोहिमेचे नेतृत्व करत होता. ब्रिटनचा किंग जॉर्ज याच्या आदेशानुसार क्रांतीकारकांच्या पुढायांना अटक करण्याची जबाबदारी गेजने पिटकायरिन याला दिली. जनरल गेजच्या मनसुब्यांचा सुगावा क्रांतीकारकांना त्या रात्रीच लागला होता. गेजचे रेडकोट म्हणजे लालसैन्य बोस्टनहून काँकर्डकडे कूच करण्याच्या आधीच क्रांतीकारक उदयोजक पॉल रिव्हेरे आणि त्याचे सहकारी बोस्टनहून वेगवेगळया मार्गे काँकर्डकडे निघाले.

- Advertisement -

रात्र वैयाची होती. घोडदळ,पायदळ,तोफखाना यांनी सज्ज मेजन जॉन पिटकायरिनच्या सैन्याला रोखायचे आणि मागे परतवायेचे आव्हान क्रांतीकारकांना पेलायाचे होते. जनरल गेजचे शिस्तबद्ध व आधुनिक हत्यारबंद सैन्यासमोर क्रांतीकारक म्हणजे नवशिकेच म्हणावे लागतील. स्वातंत्र्याची आस असणारे शेतकरी,कामगार,व्यापारी अशा लोकांचा समूह म्हणजे क्रांतीकारकांचे सैन्य. ब्रिटिश फौजेशी रणांगणावर सामाना करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ.

ब्रिटिशांशी होणाया पहिल्याच संघर्षात पराभव पत्कारणे क्रांतीकारकांना व क्रांतीला परवडणारे नव्हते. पहिलाच पराभव स्वातंत्र्ययुद्धाची समाप्ती ठरू शकत होता. कारण त्यामुळे अमेरिकन जनतेचा आत्मविश्वास खच्ची झाला असता. तसेच पहिला विजय स्वातंत्र्ययुद्धाला अक्षय उर्जा देणार होता. मेजर जॉन पिटकायरिनच्या तुकडीने रात्रीच चार्ल्स नदी पार करण्याचा निर्णय घेतला. रात्री दोनला त्यांनी नदी पार केली.

पहाटे ४.३० च्या दरम्यान ते लेगझिंगटनला पोहचले. काँकर्ड अजून काही मैलांवर होते. क्रांतीकारकांना ब्रिटिश सैन्याला काँकर्डच्या आधीच रोखायचे होते. त्यामुळे इतर ठिकाणांहून क्रांतीकारक पोहचण्यासाठी अवधी मिळणार होता. क्रांतीकारकांनी लेगझिंगटनमध्येच सैन्य तुकडीला रोखण्याचे ठरवले. लेगझिंगटनमध्ये पिटकायरिनचे २३८ सैनिक आणि ६० क्रांतीकारक एकमेकांसमोर उभे ठाकले. ब्रिटिश सैन्यासमोर क्रांतीकारकांचे बळ नगण्य आणि अनुभव नवा अशी परिस्थिती असली, तरी एक जमेची बाजू होती.

ती म्हणजे क्रांतीकारकांचे नेतृत्व कॅप्टन जॉन पार्कर करत होता. जॉन पार्कर कसलेला सेनानी होता. फ्रेंच व रेड इंडियन यांच्याशी झालेल्या अनेक लढायांचा अनुभव त्याच्या पाठीशी होता. त्याच्या ६० लोकांसह ब्रिटिशांच्या चौपट सैन्यापुढे निभाव लागणे अशक्य आहे. याची त्याला जाणीव होती. कॅप्टन जॉन पार्करसमोर प्रसंग बाका होता. हिंदी चित्रपटांमध्ये शोभावा असा हा प्रसंग. क्रांतीकारक ब्रिटिश सैन्याला आडवे आले, तरी मेजर जॉन पिटकायरिनला अस्वस्थ होण्याचे कारण नव्हते.

त्याने क्रांतीकारकांना शस्त्र खाली ठेवून शरण येण्याचा आदेश दिला. संख्या,साधने आणि सैनिकी ज्ञान असलेले लोक त्याचे सामर्थ्य होते. हातात केवळ बंदूका असलेल्या ६० क्रांतीकारकांचा त्याच्यासमोर टिकाव लागणे अनेक वेळा हिंदी चित्रपटातच शक्य होऊ शकते. मात्र जगाच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत,जेथे प्रचंड सैन्याला त्याच्यासमोर संख्येने व साधनांनी नगण्य असणाया सैन्याने धूळ चारली आहे. आत्मविश्वास आणि प्रसंगावधान अशावेळी अत्यंत मौल्यवान ठरतात.

छत्रपती शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा इतिहास अशा अनेक विस्मयकारक व अदभूत प्रसंगांनी तेजोमय असलेला आपण पाहतोच. अमर्याद आत्मविश्वास आणि अत्यंत समयोचित प्रसंगावधान हेच स्वराज्य स्थापनेच्या प्रारंभी शिवरायांचे खरे सामर्थ्य होते. चार्ल्स नदीच्या काठावर असणाया लेगझिंगटनची माती आज शिवरायांची रणनीतिचा अनुभव घेणार होती. कॅप्टन जॉन पार्करने प्रसंगावधान राखत आपल्या क्रांतीसैन्याला शस्त्र खाली ठेवण्याचा आदेश दिला. लेगझिंगटनचा गरम झालेल्या पहाट वायात दोन्ही पक्षातील सैन्यांचा श्वास रोखला गेला.

अशा तंग परिस्थितीत क्षणाक्षणाला तणाव वाढत होता. नेमके काय करायचे? आणि नेमके काय होणार? याचा अंदाज कोणालाच येत नव्हता. तेवढयात निरव शांततेला भेदत एक गोळी सुटल्याचा आवाज झाला. पहाटेच्या अंधारात गोळी कोणत्या बाजूने चालवण्यात आली,हे समजू शकले नाही. परिस्थितीतील तणाव आणि अस्वस्थता यांना चिरत ही गोळी गेली. गोळीने ठिणगीचे काम केले. धुमश्चक्रीला सुरवात झाली.

क्रांतीकारकांना ब्रिटिश सैन्य तुकडीला काही काळ रोखायचे होते. त्यामुळे ते आडवे आले होते. त्यांचा उद्देश सफल झाल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी तेथून पळ काढण्याचे ठरवले. ते पळू लागले. यामुळे क्रांतीकारक घाबरले असा समज ब्रिटिश सैन्याचा झाला. ब्रिटिश सैन्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. विजयाच्या व सामर्थ्याच्या उन्मादात ब्रिटिश सैन्याने कुरतेची परिसीमा गाठली. जमिनीवर पडलेल्या जखमी क्रांतीकारकांना संगिनीने भोसकण्याचा पराक्रम ब्रिटिशांनी केला.

चकमकीत ८ क्रांतीकारक हुतात्मा झाले. ९ क्रांतीकारक जखमी अवस्थेत ब्रिटिशांनी कैद केले. ब्रिटिशांनी क्रांतीसेनेच्या नेत्यांचा शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर सकाळी ९ वाजता काँकर्डकडे त्यांनी कूच केली. हा सुमारे ५ तासांचा कालावधी अत्यंत महत्वाचा ठरला. क्रांतीसेनेचा उद्देश सफल झाला. ब्रिटिश लेगझिंगटनमध्ये अडकले असतांना इतर अमेरिकन कांतीकारी गटांनी काँकर्डमधील बहुतेक सर्व युद्ध साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले होते. मिनीटमन यंत्रणेचा प्रभावी वापर याठिकाणी क्रांतीसैन्याने केला.

ब्रिटिश सैन्य दलाच्या आगमनाची सुचना आगामी देण्याचे काम मिनीटिमनांनी केले. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे शक्य झाले. काँकर्डकडे जाण्यापूर्वी ब्रिटिश सैन्याने लेगझिंगटन गावाची झाडाझडती घेतली. काही बंदुका,किरकोळ प्रमाणत गणपावडर,बंदुकीच्या शिशाच्या गोळया आणि काही अवजड युद्ध साहित्य सोडल्यास त्यांच्या हाती काहीच लागले नाही. ब्रिटिशांनी झाडाझडतीत घालवलेला वेळ क्रांतीकारकांना काँकर्डमध्ये उपयुक्त ठरला.

मेजर जॉन पिटकायरिनला मिनीटमन या संदेशवहन यंत्रणेच्या अफलातून वेगाची कल्पनाच नव्हती. काँकर्डमध्ये जे थोडेफार साहित्य सापडले. ते त्याने जाळून टाकले. दरम्यान संपूर्ण मॅसच्युसेटस प्रातांतून हत्यारबंद क्रांतीकारक मिनीटमेन काँकर्डच्या जंगलात येऊन दबा धरून बसले. कॅप्टन जॉन पार्कर आपल्या सहकायांसोबत त्यांना येऊन मिळाला होता. जंगलात दबा धरून गनिमी कावा साधण्यासाठी सज्ज असणाया क्रांतीकारकांमध्ये काँकर्ड गावातील क्रांतीकारक देखील होते.

मेजर जॉन पिटकायरिनच्या साहित्य जळण्याच्या पराक्रमाने काँकर्डमधून प्रचंड धुराचे लोट आकाशात दिसू लागले. यामुळे काँकर्डचे रहिवासी असणाया क्रांतीकारकांचा असा समज झाला की ब्रिटिशांनी आपली घरे पेटवली. ते पेटून उठले. पिटकायरिनने काही सैन्य काँकर्ड गावाच्या उत्तरेला असलेल्या पुलाच्या रक्षणासाठी काही सैन्य ठेवून इतर सैन्य क्रांतीकारकांच्या पाठलागावर पाठवले होते. आपली घरे जाळून टाकली जात आहे,असा समज होऊन चिडलेल्या क्रांतीकारक ब्रिटिश सैन्यावर तुटून पडले.

दोन्ही बाजूने गोळयांचा तूफान वर्षाव सुरू झाला. काँकर्डच्या जंगलात स्थिती मात्र नेमकी उलटी होती. येथे ब्रिटिश सैन्यापेक्षा क्रांतीकारकांची संख्या पाच पट अधिक होती. १२ ब्रिटिश सैनिकांना कंठस्नान घालण्यात आले. वास्तवाची जाणीव झाल्यावर ब्रिटिशांनी माघार घेण्यास सुरवात केली. आता क्रांतीकारक त्यांचा पाठलाग करू लागले. काँकर्डमधून उरलेले ब्रिटिश सैन्य लेगझिंगटनकडे धाव घेऊ लागले. त्यांचे नशिब बलवत्तर म्हणून बोस्टनहून आलेली अतिरिक्त कुमक त्यांना मिळाली.

अन्यथा एकही ब्रिटिश बोस्टनला परतला नसता. मॅसच्युसेटसच्या कानाकोपयातून हजारो हत्यारबंद क्रांतीकारक काँकर्डकडे आलेल्या ब्रिटिश सैन्याला घेरत बोस्टनकडे जाऊ लागले. अमेरिकन क्रांतीसेना ब्रिटिश अधिकायांना लक्ष करत होती. अधिकारी किंवा नायक पडला की इंग्रंज सैनिकांचे अवसान गळत होते. क्रांतीकारक शिवरायांचा गनिमी कावा वापरत होते. एका ब्रिटिश अधिकायाने लिहिलेल्या आठवणीमध्ये क्रांतीकारक सलग तीन तास गोळीबार करत ब्रिटिश सैन्याचा पाठलाग करत होते.

हा पाठलाग बोस्टन १४ मैल राहिले तोपर्यत चालू होता. क्रांतीकारकांच्या गोळयांच्या वर्षावात जीव वाचवत कशीबशी ब्रिटिश सेना बोस्टनला परतली. त्यांचे ७३ सैनिक ठार,१७४ जखमी आणि ५३ गायब अशी अवस्था झाली. क्रांतीसेनेच्या ५४ सैनिकांना वीरमरण आले. काँकर्डच्या अनपेक्षित अनुभवाने ब्रिटिशांचे गर्वहरण होऊन,त्यांचे डोळे खडकन उघडले.

दुसया दिवशी सकाळी सीमेवर जमलेल्या सुमोर १५००० क्रांतीसेनेच्या कोलाहलाने बोस्टन जागे झाले. ‘जिंकू किंवा मरूया ध्यासाने ही क्रांतीसेना बोस्टनच्या वेशीवर धडक मारण्यासाठी आली होती. रिकाम्या हाताने ती परत जाणार नव्हती,तर बोस्टनच्या रुपाने संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्घोष करणार होती.

प्रा. डॉ.राहुल हांडे, ८३०८१५५०८६

(लेखक धर्म,इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या