हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे संगमनेरात ठिय्या आंदोलन

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्याला जबाबदार असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात सात दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देऊनही या अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई न झाल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कालपासून पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. मात्र या आंदोलनाबाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

संगमनेरातील कत्तलखान्यास जबाबदार असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई न झाल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी प्रांताधिकार्‍यांना स्मरण पत्र दिले होते. प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता. अधिकार्‍यांनी लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्याने दुपारी बारा वाजेपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलन सुरू झाल्याची माहिती समजताच कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुलदीप ठाकूर, अ‍ॅड. श्रीराज डेरे, कैलास वाकचौरे, ज्ञानेश्वर थोरात, अमोल खताळ आदी यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विविध गीते सादर करण्यात आली. सायंकाळ पर्यंत एकही अधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. सात वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, तहसीलदार अमोल निकम या तीन अधिकार्‍यांनी आंदोलकांची भेट घेतली. गेट समोर आंदोलन करू नका, आत बसा अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली. मात्र ही विनंती कार्यकर्त्यांनी धुडकावून लावली. यामुळे हे अधिकारी निघून गेले.

दरम्यान याबाबत बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुलदीप ठाकूर यांनी नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याशी संपर्क साधला. अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई झाली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. श्री. शेखर यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन ठाकूर यांचे बोलणे झाले. श्री. शेखर म्हणाले ‘अधिकार्‍यांची बदली करणे हा विषय तुमचा नाही, तुम्ही हे प्रकरण विनाकारण वाढवत आहे, संगमनेरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी तुमच्यावर असेल. असे ते म्हणाले, अशी माहिती कुलदीप ठाकूर यांनी दिली.

दरम्यान सायंकाळी स्थानिक अधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पोलीस निरीक्षक यांचे निलंबन करता येत नसेल तर त्यांना जिल्हा मुख्यालयात बोलवा असे कार्यकर्त्यांनी सुचविले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रतिसाद देत नाहीत. त्यांनी संगमनेर मध्ये येऊन आमच्याशी चर्चा करावी, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरु होते.