Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedआरामदायी प्रवासासाठी खासगी रेल्वे

आरामदायी प्रवासासाठी खासगी रेल्वे

– सत्यजित दुर्वेकर

रेल्वेकडून प्रवाशांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे उत्पन्नवाढ आणि प्रवाशांचे समाधान या आधारावर रेल्वे वाहतूकीत आमुलाग्र बदल केले जात आहेत.

- Advertisement -

याअनुषंगाने भविष्यात एखाद्या खासगी कंपनीची रेल्वे धावली तर आश्चर्य वाटणार नाही. म्हणूनच रस्त्यावर खासगी वाहने धावू शकतात तर रेल्वे रुळावर खासगी रेल्वे का धावू शकत नाही, असा तर्क रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मांडला आहे. रस्त्याची निर्मिती सरकारकडूनच केली जाते, तेव्हा त्यावर केवळ सरकारीच गाड्या धावणार, असे कोणी म्हणते का? एका अर्थाने गोयल यांनी रेल्वे क्षेत्रातही खासगी रेल्वेची संख्या वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे रुळावर खासगी क्षेत्रातील अनेक रेल्वे आणण्याची योजना मांडली आहे. या योजनेचे समर्थन करताना त्यांनी काही तर्क मांडले आहेत. 1956 मध्ये रेल्वेचे राष्ट्रीयकरण होण्यापूर्वी भारतात खासगी कंपन्यांकडून रेल्वेचे वहन केले जात होते. जीआयपी (ग्रँड इंडियन पेनिनसुला) आणि बीएनआर (बंगाल-नागपूर रेल्वे) या रेल्वे चालवणार्‍या खासगी कंपन्या होत्या. ब्रिटिश कंपनी क्लिक निकसन यांची शकुंतला नावाची मीटर गेज रेल्वे विदर्भातील कापूस उत्पादक क्षेत्रात मूर्तिजापूर-अचलपूरदरम्यान धावत होती. कालांतराने ही रेल्वे बंद करण्यात आली. राष्ट्रीयकरण केल्यानंतर बीएनआरचे रुपांतर दक्षिण पूर्व रेल्वेत झाले. जुनी रेल्वे वाफेवर चालत होती. नंतर डिझेल आणि आता वीजेवर चालू लागल्या.

रेल्वेचे प्रवासी आता अधिकाधिक सुविधाजनक आणि आरामदायी प्रवासाची अपेक्षा करत आहेत. तेजस ही भारतातील खासगी कंपनीकडून चालवली जाणारी पहिली रेल्वे. आयआरसीटीसीकडून संचलित लखनौ-नवी दिल्ली तेजस एक्स्प्रेसचे उदघाटन 4 ऑक्टोबर 2019 रोजी झाले होते. अहमदाबाद-मुंबई तेजस रेल्वे देखील आयआरसीटीसीकडून चालवण्यात येते. मुंबईहून गोव्यासाठी आणि चेन्नईहून मदुराईसाठी तेजस रेल्वे चालवली जात आहे. तेजस ट्रेनमध्ये 14 नॉन एक्झिकिटिव्ह चेअरकार आहेत.

प्रत्येक डब्यात 72 प्रवासी बसतात. याशिवाय दोन एक्झिकेटिव्ह चेअरकार आहेत. त्यात 56 प्रवासी बसतात. या खासगी रेल्वेच्या कोचमध्ये बायो व्हॅक्यूम टॉयलेट, टेसेंन्सर, हँड ड्रायर, प्रत्येक प्रवाशांसाठी एलईडी टिव्ही, वाय फाय, चहा कॉफी वेडिंग मशिन, प्रसिद्ध शेफने तयार केलेले जेवण, सीसीटीव्ही कॅमेरा आदी विमानाप्रमाणे सोयी आहेत. तेजसचे भाडे शताब्दीपेक्षा 20 ते 30 टक्के अधिक आहे.

रेल्वे सुरू होताच दरवाजे आपोआप बंद होतात. यात सेमी हायस्पीड ट्रेनची कमाल गती 200 किमी प्रतितास आहे. जी मंडळी अधिक भाडे देऊन आनंददायी प्रवास करु इच्छित असतील, ते खासगी रेल्वेला प्राधान्य देतील. तेजसप्रमाणेच भारतात आणखी रेल्वे चालवण्याचा विचार करायला काय हरकत आहे, असे रेल्वेमंत्र्यांचे म्हणणे आहे. त्याला बळ मिळाले तर खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे रेल्वेही धावताना दिसतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या