ऑक्सिजनसाठी खासगी डॉक्टरांची अडवणूक सुरूच

by

अहमदनगर (प्रतिनिधी) – अतिगंभीर रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन घेताना खासगी प्लाँटवाल्यांकडून जादा पैसे घेतले जातात, अशी तक्रार खासगी डॉक्टरांनी महापालिकेच्या आरोग्य समितीकडे आज केली. त्यावर कलेक्टरांशी चर्चा करून यावर मार्ग काढू असे आश्‍वासन डॉक्टरांना देण्यात आले. बिलाअभावी कोवीड मृतदेह अडवू नका. कोरोनाच्या संकटाकडे संधी म्हणून नव्हे तर सेवा म्हणून पहा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी डॉक्टरांना दिला.

महापौर बाबासाहेब वाकळे, समितीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सदस्य निखील वारे, सचिन जाधव, सतीश शिंदे, संजय ढोणे यांच्या उपस्थितीत महापालिकेत आज शहरातील खासगी डॉक्टर व त्यांच्या प्रतिनिधीची बैठक पार पडली. या बैठकीत डॉक्टरांच्या अडचणी समजवून घेण्यात आल्या. तसेच पैशाअभावी कोणाची अडवणूक करू नका असे आवाहनही करण्यात आले. पेशंटकडून अतिरिक्त शुल्क आकरणी होत असल्याचा विषयही बैठकीत निघाला. मात्र शासनाचे दर आणि त्याशिवाय होणारे उपचार याचा विचार करूनच हॉस्पिटल बिल आकारणी करते, असे स्पष्ट करत खासगी डॉक्टरांनी ऑक्सिजनसाठी खासगी प्लाँटवाले जादा पैसे घेऊन अडवणूक करतात, असा आरोप केला.

तत्काळ ऑक्सिजन हवा असेल तर आणखी जादा पैसे घेतात, अशी तक्रार केली. बैठकीतूनच प्लाँट मालकांकडे याबाबत विचारणा झाली, त्यावेळी लिक्वीड गॅस कमी येत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. रेमडेसिवीर इंजेक्शनची अजूनही गरज आहे. ते पुरेसे मिळावेत अशी मागणी डॉक्टरांनी केली. महापालिकेने हॉस्पिटलला लावलेले टॅक्सेस कमी केले तर पेशंटला बिलात आणखी सवलत देता येणे शक्य असल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला.

ऑक्सिजन प्लँटसाठी तीन जागांची पाहणी

महापालिका स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभा करणार आहे. त्यासाठी सावेडी गावातील जागा, जुना कोंडवाडा आणि सावेडीतीलच कचरा डेपोच्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यातील कचरा डेपोच्या जागेला प्राधान्य देण्यात येत आहे. हा प्लाँट उभारण्यासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून अभियंता परिमल निकम यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजन बेडचे कोवीड सेंटर सुरू करण्यात येणार असून त्याची जबाबदारी अभियंता राजेंद्र मेहेत्रे यांच्यावर समितीने सोपविली.

समितीचे कौतूक

कोरोनाची महामारी आल्यापासून खासगी डॉक्टरांची बैठक आरोग्य समितीने घेतली. खासगी डॉक्टरांच्या अडचणी वर्षभरात कोणी, कधी समजून घेतल्याच नाही. प्रथमच अशी बैठक घेतली. खासगी डॉक्टरांना समस्या मांडण्याचे व्यासपीठ या बैठकिच्या निमित्ताने मिळाले, असे सांगत डॉक्टरांनी आरोग्य समितीचे कौतूक केले. तसेच अशा बैठका वारंवार व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

सोशल मिडीयातून बदनामी

खासगी डॉक्टरांकडून कोरोनाग्रस्ताला अतिरिक्त बिलं घेतले जाते. बिलासाठी डेडबॉडी अडविली, या निगेटिव्ह न्यूजमधून सोशल मिडियावर खासगी हॉस्पिटलची बदनामी केली जाते, अशी खंत यावेळी डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आली. मात्र एखाद्या हॉस्पिटलने गरीब पेशंटवर मोफत उपचार केले, असे पॉझिटिव्ह काम खासगी डॉक्टरांनी करावे. त्याला सोशल मिडियासोबतच पत्रकारही प्रसिध्दी देऊन पॉझिटिव्ह बाजू मांडतील असे समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी सुचविले.