Thursday, April 25, 2024
Homeनगरखासगी जाहिरातबाजींमुळे राहुरीचे सौंदर्य बिघडले

खासगी जाहिरातबाजींमुळे राहुरीचे सौंदर्य बिघडले

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

सध्या राहुरी शहरात खासगी जाहिरातदारांच्या फलकबाजीमुळे शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण झाले आहे. अगदी जेथे नगरपालिकेच्या स्वच्छताविषयीच्या जाहिराती भिंतीवर झळकल्या, अगदी तेथेच काही खासगी जाहिरातदारांनी आपल्या जाहिरातीचा टेंभा मिरविल्याने शहर विद्रुप होत आहे. आता या शहराच्या सौंदर्याला खीळ घालणार्‍या या जाहिरातदारांना आवर घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पालिका प्रशासनाने या जाहिराती तातडीने काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.

- Advertisement -

तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीचे नगराध्यक्ष असताना राहुरी शहरवासियांना स्मार्टसिटीचे स्वप्न दाखविले होते. त्यादिशेने त्यांनी दमदार पावलेही टाकलेली आहेत. दोनवर्षे नगराध्यक्ष पदावर असताना त्यांनी राहुरी शहरात भरीव कामे केली. प्राजक्त तनपुरे हे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार सोडला. त्यानंतर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. राहुरी शहर स्मार्टसिटीच्या ऐवजी फलकांचे शहर बनले.

प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगरपरिषदेच्या माध्यमातून भरपूर विकास कामे केली. शहरात भूमिगत गटारी, सौरदिवे आदी कामे झाली. प्राजक्त तनपुरे आमदार होऊन राज्यमंत्री झाले. त्यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार सोडला. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे कामकाज सुरू आहे. नगराध्यक्ष अनिल कासार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासन स्वच्छ राहुरी व सुंदर राहुरीचे स्वप्न उराशी बाळगून जिवाचे रान करीत आहेत. मात्र, शहरवासियांकडून शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे. शहरात शनिचौक, शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक, तसेच मुख्य रस्त्यावर जाहिरातींचे फलक लावले जात आहेत.वाढदिवस, पतसंस्था, खासगी क्लासेस यांच्या जाहिरातींचे मोठमोठे फलक लावले जात आहेत. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून काही ठिकाणी जाहिरात केली आहे. त्या जाहिरातींना झाकून वैयक्तिक जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.

रहदारीच्या ठिकाणी तसेच रस्त्यावर लावण्यात आलेले जाहिरात फलक पाहत असताना अनेक छोटेमोठे अपघात होत आहेत. शहराचे विद्रुपीकरण होत आहे. पालिका प्रशासनाने कारवाई करून जाहिरात फलक लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या