Thursday, April 25, 2024
Homeनगरदेवघराच्या मागणीसाठी कैद्यांचा अन्नत्याग

देवघराच्या मागणीसाठी कैद्यांचा अन्नत्याग

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

नवरात्र उत्सवात देवीची पूजा करता यावी यासाठी कारागृह परिसरात छोटेसे देवघर बनविण्यास कारागृह प्रशासनाने परवानगी नाकारल्याने संगमनेर येथील तुरुंगातील कैद्यांनी सोमवारी रात्री अन्नाचा त्याग केला. कैद्यांनी अचानक अन्नत्याग केल्याने कारागृह व पोलीस प्रशासनाची धांदल उडाली.

- Advertisement -

संगमनेर पोलीस ठाण्याच्या शेजारीच कारागृह बांधण्यात आलेले आहे. या कारागृहात तीन बराकी असून विविध गुन्ह्यातील कैदी या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तीन बराकीमध्ये अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त कैदी शिक्षा भोगत असतात. गंभीर गुन्हे दाखल असलेले काही कैदी अनेक दिवसांपासून या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. कारागृहात आपला वेळ जावा यासाठी हे कैदी वेगवेगळे प्रयोग करत असतात.

गुन्हेगार असले तरी बहुतांशी कैदी हे अध्यात्म पाळतात. दररोज सायंकाळी सहानंतर हे कैदी वेगवेगळ्या आरत्या म्हणत असतात. कारागृहातील कैदी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरे करतात. या कारागृहाच्या परिसरात देवतांचे फोटो लावण्यात आलेले आहे. नवरात्र उत्सव काळामध्ये देवीची पूजा करता यावी यासाठी कारागृहामध्ये छोटेसे देवघर असावे अशी मागणी काही कैद्यांनी तुरुंग प्रशासनाकडे केली. मात्र तुरुंगाधिकारी यांनी यास नकार देत पोलीस अधिकार्‍यांची परवानगी घ्यावी, असे सांगितले.

यामुळे संतप्त झालेल्या कैद्यांनी अन्नाचा त्याग करून दिवसभर उपाशी राहणे पसंत केले. कैद्यांनी अन्नाचा त्याग केल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सहकारी पोलीस कर्मचार्‍यांसह कारागृहात भेट दिली. यावेळी त्यांनी कैद्या सोबत चर्चा केली. पोलीस निरीक्षकांनी कोणताही निर्णय घेतला नाही. यानंतर रात्री उशिरा कैद्यांनी जेवण केले.

देवघराची परवानगी देता येणार नाही

दरम्यान याबाबत कारागृहातील कर्मचारी पिराजी यांच्याशी संपर्क साधला असता आपण साधा क्लर्क आहोत, कारागृहातील माहिती तुम्ही तहसीलदार अथवा नायब तहसिलदारांकडून घ्या, असे त्यांनी सांगितले. यानंतर नायब तहसीलदार तळेकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण कारागृहातील माहिती घेतली आहे. कारागृहामध्ये देवघराची परवानगी देता येणार नाही. प्रशासनाने कैद्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवण करायचे की नाही हा निर्णय त्यांचा आहे, असे श्री. तळेकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या