Wednesday, April 24, 2024
Homeनगरलस न घेतलेल्यांकडून करोनाचे सर्वेक्षण, संसर्ग वाढण्याची भिती

लस न घेतलेल्यांकडून करोनाचे सर्वेक्षण, संसर्ग वाढण्याची भिती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विभागीय आयुक्त यांच्या आदेशानूसार जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी व शिक्षक यांच्या मार्फत कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यातील बहुतांशी संवर्गातील कर्मचार्‍यांचे करोना लसीकरण झालेले नाही. यामुळे जिल्ह्यात करोना संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. प्रशासनाने आधी 100 टक्के शिक्षकांचे लसीकरण करून त्यांच्याकडे करोनाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाने केली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 28 एप्रिल ते 2 मे या कालावधीमध्ये विभागीय आयुक्त नाशिक यांचे आदेशान्वये कुटुंब सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी व शिक्षक यांचा समावेश आहे. यातील शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 30 शिक्षक करोना आजाराने मृत्यूमुखी पडलेले असून शेकडो शिक्षकांवर उपचार सुरू आहेत. या सर्वेक्षणामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा ताप, अन्य लक्षणे इत्यादी तपासणी करावयाची आहेत. जिल्ह्यात शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही.

त्यामुळे सद्यस्थितीत शिक्षकांकडून सर्वेक्षण झाल्यास पॉझिटिव्ह शिक्षकांकडून गावांमध्ये संसर्ग पोहोचण्याचा तसेच गावातील पॉझिटिव व्यक्तींकडून शिक्षकांमार्फत अन्य कुटुंबापर्यंत संसर्ग पोहण्याचा गंभीर धोका आहे. शिक्षकांनी आतापर्यंत कधीही राष्ट्रीय काम नाकारलेले नाही. प्रत्येक आपत्तीमध्ये शिक्षकांनी नेहमीच साथ दिलेली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये कोट्यावधी रुपये शिक्षकांनी जमा करून करोना संकटात कर्तव्यभावनेने मदत केलेली असल्याचे राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळ यांचे म्हणणे आहे.

यामुळे प्रशासनाने आधी विशेष कॅम्प लावून शिक्षकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करून मगच ठराविक दिवसानंतर हे करोना सर्वेक्षण अथवा नियंत्रणांची जबाबदारी शिक्षकांवर सोपवावी व होणारी गंभीर साखळी थांबवावी, अशी मागणी जिल्हा संघाचे अध्यक्ष माधव हासे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत, रहेमान शेख, मिनाताई गिरमे, गजानन ढवळे, राजेंद्र शिंदे, रविंद्र पिंपळे, अनिल आंधळे, पांडुरंग काळे, कल्याण शिंदे, नवनाथ तोडमल, राजाभाऊ बेहळे, भास्कर कराळे बाळासाहेब डमाळ, दादा वाघ, शैलेश खणकर यांनी केली आहे. यासंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना पत्र पाठविलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या