Thursday, April 25, 2024
Homeनगरप्राथमिक केंद्रनिहाय तलाठी ठेवणार ‘वॉच’

प्राथमिक केंद्रनिहाय तलाठी ठेवणार ‘वॉच’

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यातील तलाठ्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय ग्रुप बनविण्यात आले आहेत. हे तलाठी आता गावातील ग्रामसेवक,सरपंच यांच्या मदतीने संबंधित आरोग्य केंद्रावर वॉच ठेवणार आहेत. एकही करोना रुग्ण घरी राहणार याची दक्षता घेण्यात येणार असून यासाठी ग्रामसुरक्षा समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यानुसार नियोजन करून सर्व कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत सूचना संबंधित तलाठ्यांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिल्या आहेत.तसेच कोविडसदृश लक्षणे असल्यास निगेटीव्ह अहवालाशिवाय लसीकरण करणेत येऊ नये, असे ही आदेश त्यांनी दिले आहे.

- Advertisement -

करोना चाचणी यापुढे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होणार आहे. ज्यांची आरटीपीसीआर चाचणी झालेली असून अहवाल येणे बाकी आहेत, अशा सर्वांना प्रत्येक गावातील शाळेत असणार्‍या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच ऑक्सिजन पातळी 95 च्या खाली असेल त्यांना भाळवणी कोविड केअर सेंटर, पिंपळगाव रोठा, ग्रामीण रुग्णालय पारनेर, पूर्णवाद भवन पारनेर, मातोश्री हॉस्पिटल कर्जुलेहर्या येथे पाठवण्यात येणार आहे. कोणालाही घरी ठेवण्यात येणार नाही. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारपासून 50 रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या जाणार आहेत.

ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील त्यांना त्या गावातील शाळेमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. गावामध्ये विलगीकरण कक्षात पॉझिटिव्ह रुग्ण व संशयित रुग्ण यांना एकाच खोलीत ठेवू नये, त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात यावे. तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये येणारा पॉझिटिव्ह रुग्ण हा घरी राहणार नाही, याची खात्री संबंधित करोना ग्राम सुरक्षा समितीने करून घ्यावी. कोणत्याही डॉक्टरने रुग्णाला घरी राहण्यास सांगू नये, तसेच घरी उपचार करू नयेत. होम आयसोलेशन पूर्णपणे बंद आहे, असे केल्यास संबंधित डॉक्टरवर कारवाई केली जाईल.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील किमान 20 संशयित लोकांच्यात चाचण्या संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर करून घेण्यात याव्यात. तालुक्यातील तलाठी यांनी प्रत्येक आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून गाव सुरक्षित ठेवायचे आहे. आरोग्य केंद्रांवर सकाळी 11 ते 1 या वेळेत करण्यात येणार असून रॅपिड अँटिजेन चाचण्या दिवसभर करण्यात येतील.

डाटा एंट्री ऑपरेटर यांनी तात्काळ येणारी माहिती भरणार असून त्याची खातरजमा संबंधित तलाठी करणार आहेत. दिवसभरातील सर्व माहिती पाच वाजेपर्यंत संबंधित कार्यालयांमध्ये जमा करण्यात येणार असून सर्व तलाठ्यांना तहसीलदार देवेरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लक्ष ठेवून कामकाज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. करोनाचा अहवाल निगेटिव्ह येणार्‍यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय ग्रुप तयार करण्यात आले आहेत. तालुक्यातील सर्व तलाठ्यांमार्फत गावनिहाय बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.करोना पॉझिटिव्ह रुग्ण यापुढे घरी राहणार नाही, यासंदर्भात खबरदारी घेतली जाणार आहे. तालुक्यातील सर्व तलाठी करोना काळामध्ये चांगले काम करत आहेत.

– संतोष मांडगे, तालुकाध्यक्ष, पारनेर तालुका तलाठी संघटना.

- Advertisment -

ताज्या बातम्या