Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशंभर वर्ष पुरातन श्री दत्त मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रियेद्वारे जतन

शंभर वर्ष पुरातन श्री दत्त मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रियेद्वारे जतन

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

शंभर वर्ष पुरातन श्री दत्त मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रियेद्वारे जतन केले गेले.यावर्षी या मूर्तीचा हा शंभरावा दत्तजयंती सोहळा आहे. या आव्हानात्मक कामासाठी मिट्टी फाऊंडेशनने पुढाकार घेतला.

- Advertisement -

नाशिक शहराजवळील जानोरी गावातील भवानी पेठ येथील कुलकर्णी वाड्यामधील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर आहे. श्री दत्त मूर्ती पुरातन असल्याने त्याला मालिन्य आल्याने व त्याची सूक्ष्म स्वरूपात झीज होत असल्याने ते थांबवण्याचे मोठे आव्हान होते. यासाठी शहरातील प्रसिद्ध शिल्पकार व कला संवर्धन तज्ञ मयूर मोरे व त्यांच्या मिट्टी फाऊंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करून मूर्तीला नवचैतन्य देण्यात आले.

1920 सालापासून मंदिराची बांधणीला सुरुवात होऊन 10 डिसेंबर 1921 मध्ये हे मंदिर लोकांसाठी खुले झाले. याची लिखित नोंद मंदिराच्या भिंतीवर कोरलेली आहे. मंदिरात विशेष करून दत्त जयंती श्री गुरुपौर्णिमा व सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. राज्यातील इतर भागाप्रमाणे येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी वार्षिक बोहोड्याचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही श्री गुरुदत्तात्रय यांच्या कुमार वयातील शिल्प प्रतिमा आहे. या मूर्तीमध्ये भिक्षेसाठी झोळी नसलेली व हातामध्ये रुद्राक्ष माळ धारण केलेली मनोहारी मूर्ती आहे.

ह्या अशा पुरातन मूर्तीचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत आव्हानात्मक होते कारण मूर्तीचा बांधा आणि हात व पाय नाजूक असल्याने बऱ्याच अडचणी होत्या परंतु हे आव्हानात्मक काम पूर्ण करण्याचा मोरे यांनी पूर्ण प्रयत्न केला व हे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. श्री दत्त मूर्तीची मालिन्यता दूर करण्यासाठी पारंपरिक पद्धती सह रासायनिक संवर्धन प्रक्रिया करून त्यावर “रिव्हरसेबल” प्रकाराने मूर्तीवरील दागिन्यांना २४ कॅरेट चे गोल्ड फॉईलींग व रंगकाम करून सौंदर्यीकरण करण्यात आले.

राष्ट्रीय पातळीवर पुरातत्त्व संस्कृती संवर्धन या विषयावर “इंन्टॅक्ट” ही संस्था प्रभावीपणे कार्य करते आहे. मिट्टी फाउंडेशन ही या संस्थेसोबत कार्यरत असल्याने येणार्‍या काळात या विषयावर भरीव कामगिरी करण्याचा त्यांचा मानस आहे. १३ दिवसांच्या प्रयत्न करत हे आव्हानात्मक काम मयुर मोरे व कुटुंबीयांनी पूर्ण केले.

या कामी प्रसिद्ध शिल्पकार श्रेयस गर्गे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अत्यंत जागृत अशी ख्याती असलेल्या या श्री दत्त मंदिराची देखभाल गोविंद कुलकर्णी , निलेश कुलकर्णी तसेच अँड. संतोष कुलकर्णी यांच्यासह सर्व कुटुंबीय हे मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा व देखभाल करण्याचे काम मनोभावे पार पाडतात. शहर व जिल्ह्यातील अनेक प्राचीन धार्मिक दृष्ट्या महत्त्व असलेले मूर्ती व मंदिराचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.

अशा प्रकारच्या मंदिरात मूर्ती बाबत कोणाला माहिती असेल किंवा संवर्धनासाठी मदत हवी असेल तर मिट्टी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना योग्य ती मदत केली जाईल असे मयूर मोरे यांनी आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या