Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआजादी का अमृत महोत्सवात गरोदर मातांना मिळणार आरोग्य सेवा

आजादी का अमृत महोत्सवात गरोदर मातांना मिळणार आरोग्य सेवा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra MOdi) यांनी पाहिलेले स्वस्थ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, स्त्री रुग्णालय मालेगाव, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे 13 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या संकल्पनेनुसार विशेष गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर (Dr. Kapil Aher) यांनी दिली आहे….

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांचे सनियंत्रणाखाली विशेष गरोदर माता तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात जिल्ह्यातील गरोदर मातांचे आरोग्य चांगले राहावे, गरोदरपणामध्ये विशेष स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी व्हावी त्यांना औषधोपचार, आहार सल्ला बालकाची काळजी याविषयी मार्गदर्शन मिळावे, जोखमीच्या मातांचे प्रमाण कमी करणे व माता व बालक मृत्यू कमी करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात जिल्हा रुग्णालयासह 15 तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांकडून गरोदर मातांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच अतिजोखमीच्या मातांना आरोग्य सेवा देऊन त्यांना जोखमीपासून संरक्षित कसे करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गरोदरपणात लागणारी औषधे रक्त वाढीच्या व कॅल्शियमच्या गोळ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे गरजू गरोदर मातेला सोनोग्राफी करावयाची असल्यास संदर्भ सेवा दिली जाणार आहे.

देशहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे म्हणजे कुटुंब नियोजनाचे महत्व पटवून देण्यासाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कुटुंब नियोजनाबाबत कायमच्या व तात्पुरत्या पद्धतीविषयी माहिती दिली जाणार आहे. यामध्ये स्त्रियांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पुरुषांनी कुटुंब नियोजनामध्ये सहभाग वाढवण्यासाठी पुरुष नसबंदी याविषयी विशेष जनजागृती करण्यात येणार आहे.

तसेच गरोदर मातेचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या याविषयी समुपदेशन करण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभागामार्फत उत्कृष्ट नियोजन करण्यात येत आहे. भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरे करत असताना जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या विशेष गरोदर मातेला आरोग्य सेवा देणे कामी शिबिरासाठी सज्ज झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी प्रयत्न करून हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे.

यासाठी गरोदर मातांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या तपासणीसाठी स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांची विशेष नेमणूक करून प्रत्येक तालुक्यातील महत्वाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना हे डॉक्टर कसे उपलब्ध होतील व त्यांची सेवा प्रत्येक गरोदर मातेला कशा पद्धतीने मिळेल याबाबत अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर हे सर्व प्रकारचे औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

शिबिर आयोजित केलेल्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विशेष वाहन व्यवस्था व आहार व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावरून निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य रुग्ण डॉ. अनंत पवार व डॉ. सुनील राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात हे सनियंत्रण करीत आहेत.

आशा सेविकांमार्फत या शिबिरामध्ये येऊन प्रत्येक गरोदर मातेने आपली स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी करून घेवून आपले बाळंतपण सुखरूप आणि सुरक्षित व्हावे यासाठी आरोग्य विभागाने आयोजित केलेला शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या