Friday, April 26, 2024
Homeनगरपीआरसीच्या कामात झेडपी व्यस्त

पीआरसीच्या कामात झेडपी व्यस्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुढील आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामांची झाडाझडती घेण्यासाठी जिल्हा दौर्‍यावर येत आहे. यासाठी सध्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी ते लिपीक सर्वजण पीआरसीच्या प्रश्नावलीनुसार माहिती संकलित करण्यात व्यस्त आहे. संकलित होणार्‍या माहितीची पुस्तिका तयार करून ती ग्रामविकास विभागाचे उपसचिव आणि पंचायत राज समितीच्या अध्यक्षांसह सदस्य असणार्‍या 32 आमदारांना सादर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, पीआरसी दौर्‍याच्या नियोजनासाठी प्रशासन व्यस्त असून त्यांच्या राहण्यापासून जेवण, जिल्ह्यात दौरा करण्यासाठी वाहनाची व्यवस्था, सभागृहात साक्ष नोंदविण्यासाठी बैठक व्यवस्था याच्या नियोजनात अधिकारी चांगलेच गुंतलेले आहे. पंचायत राज समितीला हक्क भंग प्रस्ताव सादर करण्याचे अधिकार असल्याने त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक माहिती संकलन करण्यात सध्या सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस काम करतांना दिसत आहेत.

जिल्हा परिषदेत दर पाच वर्षांनी पंचायत राज समिती ही केलेली विकास कामे, राबविलेल्या योजना, शिक्षणासोबत आरोग्य सेवांचा दर्जा, खर्चाच्या ऑडिटमध्ये निघालेल्या त्रुटी आदींची तपासणी करण्यासाठी येत असते. 2018 मधील केलेल्या कामाच्या लेखा परीक्षणात 180 पेक्षा अधिक पॅरे निघालेले आहेत. याबाबत पंचायत राज समितीचे सदस्य जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष नोंदविणार आहेत. त्यात समाधानकारक उत्तेर न मिळाल्या पुन्हा मुंबई संबंधीत विषयांवर सुनावणी लावणार आहेत.

यामुळे पंचायत समितीच्या वतीने विचारण्यात येणार्‍या प्रश्नांची प्रश्नावली जिल्हा परिषदेला पाठविण्यात आलेली असून त्यानूसार उत्तरांची पुस्तिका तयार करून ती सोमवारी ग्रामविकास विभागाला सादर करण्यात आलेली आहे. आता या पुस्तिकांच्या प्रती समितीचे सदस्य असणार्‍या आमदारांना सादर करण्यात येणार असून त्याचा अभ्यास करून समितीचे सदस्य असणारे आमदार प्रत्यक्षात पाहणी आणि साक्षीच्यावेळी उपप्रश्न विचारणार आहेत.

झेडपीत रंगरंगोटी अन् स्वच्छता

पंचायत राज समितीच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दार, जिल्हा परिषदेच्या विविध विभागात प्रवेश करणारी ठिकाणे आणि जिन्यांची सध्या रंगरंगोटी सुरू करण्यात आली आहे. यासोबत सर्व विभागात स्वच्छता करण्यात येत असून कर्मचारी माहिती संकलित करण्यासोबतच स्वच्छतेच्या कामात स्वत: झोकून देतांना दिसत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या