ओझर बंधार्‍या नजिक प्रवरा डाव्या कालव्याला भगदाड

jalgaon-digital
2 Min Read

रहिमपूर |वार्ताहर| Rahimpur

उत्तर नगर जिल्ह्याला प्रवरा डाव्या व प्रवरा उजव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी देणार्‍या संगमनेर तालुक्यातील ओझर बंधार्‍या नजीक प्रवरा डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे भविष्यात होणारा संभाव्य धोका लक्षात घेता हे भगदाड तात्काळ बुजवणे अथवा दुरुस्त होणे गरजेचे आहे. मात्र असे असतांना ओझर बंधार्‍याच्या शाखा अभियंत्याचे मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी भविष्यात कालवा फुटण्याची भिती निर्माण झाली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. हा विसर्ग पुढे संगमनेर तालुक्यातील ओझर बंधार्‍यात येतो. त्यानंतर ओझर बंधार्‍यातून पूर्वेला असणार्‍या प्रवरा डाव्या व प्रवरा उजव्या कालव्याने लाभक्षेत्रातील गावातील शेतकर्‍यांच्या हजारो हेक्टर असणार्‍या शेत जमिनीपर्यंत जातो. प्रवरा उजवा कालवा राहुरीच्या पुढे जातो. तर डाव्या कालव्याचे पाणी लोणी, श्रीरामपूर, नेवासा आदी लाभ क्षेत्रातील गावापर्यंत जात असते. प्रवरा उजव्या कालव्याच्या तुलनेत प्रवरा डाव्या कालव्याची पाणी वाहन क्षमता जास्त आहे. तसेच प्रवरा डाव्या कालव्यावर हजारो शेतकर्‍यांचे प्रपंच अवलंबून आहेत. त्यामुळे प्रवरा डाव्या कालव्याला दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रेटची तटबंदी करण्यात आली आहे.

मात्र या सिमेंट काँक्रीटच्या तटबंदीला ओझर बंधार्‍या नजीक पडलेल्या भगदाडाने धोका निर्माण झाला आहे. गत महिना दीड महिन्यापूर्वी अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. त्याचे पाणी प्रवरा नदीतून ओझर बंधार्‍यात आले. आणि तेथून प्रवरा डाव्या व प्रवरा उजव्या कालव्यातून पुढे मार्गस्थ झाले. त्यावेळीच ओझर बंधार्‍या नजीक असणार्‍या भगदाडाच्या तोंडापर्यंत पाणी आले होते. मात्र त्यावेळी सुदैवाने येथे कालव्याला धोका पोहोचला नाही.

मात्र भविष्यात येथे कालवा फुटण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्याच बरोबर याच प्रवरा डाव्या कालव्याला ओझर बंधार्‍यापासून पूर्वेला दोन-अडीच हजार फुटावर क्षिरसागर मिस्तरी यांच्या घराच्या जवळ दुसरेही भगदाड पडले आहे. असे असताना ओझर बंधार्‍याची सुरक्षाव्यवस्था ज्यांच्या खांद्यावर आहे अशा शाखा अभियंत्यास याचे सोयरे सुतक नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी प्रवरा डावा कालवा फुटण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *