Thursday, April 25, 2024
Homeनगरप्रवरेच्या पुरात दोघे मोटारसायकस्वार बुडाले

प्रवरेच्या पुरात दोघे मोटारसायकस्वार बुडाले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

प्रवरा नदीवरील जुन्या छोट्या पुलावरून मोटारसायकवरून जाणार्‍या दोघा युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे यातील एकजण बचावला असून दुसरा मात्र वाहून गेला. सायंकाळपर्यंत त्यांचा तपास लागू शकला नाही. ही घटना काल दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

भंडारदरा धरण पूर्ण भरले असून पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. धरणातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. यामुळे नदीला मोठा पूर आला आहे. संगमनेर शहरालगतच्या प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरून पाणी वेगाने वाहत होते.

पुलावरून पाणी वाहत असतानाही काही मोटरसायकलस्वार या पुलावरून ये-जा करत होते. तालुक्यातील कोळवाडी येथील शरद धोंडीबा कोल्हे व सुनील चांगदेव आहेर हे आपल्या प्लॅटिना मोटरसायकलवरून पुलावरून जात होते. मात्र त्यांना पुलावरील पाण्याचा अंदाज आला नाही. पुलाच्या मध्यभागीच त्यांची गाडी बंद पडली.

नदीच्या पुलावर पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने ते मोटरसायकलसह पाण्यात बुडाले. यातील सुनील आहेर याने नदीच्या काठावर असलेल्या एका झाडाच्या फांदीचा आधार घेतला. तो पुरात बुडत असल्याचे पाहून उपस्थित नागरिकांनी मोठ्या धाडसाने त्याला बाहेर काढले. शरद कोल्हे मात्र वाहून गेला.

घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहून गेलेल्या इसमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. पुलावरुन पाणी वाहत असताना नागरिकांनी पुलावरून वाहन चालवू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या