Thursday, April 25, 2024
Homeनगरनिळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम सुरू करा, अन्यथा आंदोलन

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम सुरू करा, अन्यथा आंदोलन

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

जिरायत भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याची राहुरी तालुक्यातील कामे गेल्या एक महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत. धरणाच्या कामाला निधी उपलब्ध असूनही कामे बंद ठेवण्याचा हेतू सर्वसामान्यांना समजत नाही त्यासाठी एका आठवड्यात कामे सुरू करावी. अन्यथा, लाभधारक शेतकर्‍यांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

श्री. तनपुरे म्हणाले की, निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचा जिरायत असलेला शेवटचा भाग राहुरी तालुक्यात आहे. तालुक्यातील कायम दुष्काळग्रस्त असलेल्या या 21 गावांना निळवंडे धरणाच्या कालव्याद्वारे प्रत्यक्ष पाण्याचा लाभ होणार आहे. शेतकरी पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, कालव्याची तालुक्यातील कामे वारंवार खंडित ठेऊन, कामांना विलंब केला जात आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात करोनाच्या जागतिक संकटात निळवंडे कालव्यांची कामे वेगाने चालू होती. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून अडीच वर्षात निळवंडे कालव्यांसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळविला. त्यामुळे कालव्यांच्या कामांना गती मिळाली. कामे अवाक्यात आली. उजव्या कालव्यांची अद्याप 30 टक्के कामे व्हायची आहेत.

निळवंडे कालवा कृती समितीतर्फे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान शासनातर्फे उजव्या कालव्यांची कामे जून 2023 अखेर पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. अवघ्या तीन महिन्यात उजव्या कालव्याची 30 टक्के कामे पूर्ण करण्याचे आव्हान आहे. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात निळवंडे कालव्यासाठी 269 कोटी 99 लाखांची तरतूद केली आहे. नाबार्डची 100 कोटींची तरतूद आहे. निधी उपलब्ध असून एक महिन्यापासून बंद असलेली कामे तात्काळ सुरू करावीत. येत्या आठ दिवसांत कामे चालू केली नाही. तर, तालुक्यातील लाभार्थी 21 गावांमधील नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही तनपुरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या