दिग्गीराजांना नशिबाची हुलकावणी!

jalgaon-digital
8 Min Read

प्रफुल्ल कुलकर्णी- ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

केंद्रीय पातळीवर भाजपकडून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आगमनापासून काँग्रेसविरोधात आक्रमक आघाडी उघडण्यात आली. सातत्याने काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल झाला. या काळात एक नेता भाजपला अंगावर घेत होता, ते नाव म्हणजे दिग्विजय सिंग! गांधी परिवाराचे जवळचे म्हणून त्यांची वक्तव्येही अनेकदा गंभीरतेने घेतली गेली. पुढे त्यांच्या काही राजकीय भुमिकांमुळे पक्षच अडचणीत आला. कालांतराने पक्षातूनही त्यांना साईडट्रॅक केल्यासारखी स्थिती निर्माण झाली. एकेकाळी मध्यप्रदेशात राजकारण करत असताना दिग्गीराजा देशभर चर्चेत होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद गमावल्यावर केंद्रीय पक्ष संघटनेत काम सुरू केल्यावरही ते वजनदार नेते होते. कालांतराने स्थिती बदलत गेली. आता ते काहीसे अडगळीत आहेत. पक्षाला मोठ्या अपेक्षा असलेल्या या नेत्यासाठी ही स्थिती का उद्भवली? काही राजकीय आखाडे चुकले हे खरेच, पण त्यांच्या हातावरील रेषाही यास कारणीभूत ठरल्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे शनी ग्रहावरील आडवा आलेल्या हृदय रेषेच्या तुकड्याने त्यांच्या यशाला मर्यादा घातली

दिग्विजय सिंग यांचा जन्म एका संस्थानिकाच्या कुटुंबातील. इंदूर येथे 28 फेब्रुवारी 1947 रोजी झाला. त्यांचे वडील बलभद्र सिंग हे राघोगडचे राजे. हा प्रदेश सध्या मध्य प्रदेशातील गुना जिल्हा म्हणून ओळखला जातो. बलभद्र सिंग 1951 च्या निवडणुकीनंतर राघोगड विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अपक्ष आमदार होते. राजघराण्यातील असल्याने स्थानिक राजकारणात दिग्विजय सिंग आजही दिग्गीराजा या नावानेच ओळखली जातात. त्यांचे शिक्षणात अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. 1969 मध्ये आशा यांच्याशी विवाह झाला. आशा सिंग यांच्या निधनानंतर दिग्गीराजांनी टीव्ही अँकर अमृता राय यांच्याशी दुसरे लग्न केले. या विवाहावरून बरेच राजकीय वादंग माजले होते. विरोधकांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. मात्र ते या आरोपांना पुरून उरले.

दिग्विजय सिंग यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात राघोगड पालिकेपासून केली. 1969 ते 1971 या काळात ते नगराध्यक्ष होते. याच काळात विजयराजे सिंधिया यांनी त्यांना जनसंघात सामील होण्याची ऑफर दिली होती. त्यांनी ती नाकारली. पुढे ते काँग्रेसमध्ये सामील झाले. 1977 मध्ये ते राघोगडचे आमदार झाले. याच काळात तत्कालीन मातब्बर नेते अर्जुनसिंग यांनी त्यांना हेरले. अर्जुनसिंग यांच्या नेतृत्वाखालील प्रदेश सरकारमध्ये 1980 ते 1984 या काळात त्यांना राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. 1985 ते 1988 दरम्यान मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. याच काळात त्यांचा राजीव गांधींशी संपर्क आला. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत राजगड लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. 1977 मध्ये निर्माण झालेला हा मतदारसंघ जिंकणारे ते पहिले काँग्रेस नेते होते. 1993 पर्यंत ते खासदार म्हणून केंद्रीय राजकारणात होते.

1993 मध्ये त्यांना अचानक राज्यात राजकारणात परतण्याची संधी मिळाली. पक्षाने संधी दिल्याने खासदारकीचा राजीनामा देवून ते थेट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हे मोठे वळण होते. सत्तेवर येताच त्यांनी राजकारणातील उच्चवर्णीय नेत्यांचा प्रभाव झुगारून लावत दलित-आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक योजनांची आखणी केली. काँग्रेसपासून दूर होणार हा सामाजिक गट पुन्हा सोबत घेण्यात दिग्गिराजा या योजनांमुळे यशस्वी ठरले. शिक्षण हमी योजना, भूमिहीन दलित आणि आदिवासींना सामायिक चराई जमिनीचे पुनर्वितरण, शेतकर्‍यांना मोफत वीज, ग्रामस्थांना अधिकार सोपवण्याचे साधन म्हणून पंचायती राजचा प्रचार यात ते यशस्वी झाले. आर्थिक, सामाजिक सुधारणांसोबत त्यांनी शिक्षणावर मोठा भर दिला. त्यामुळे 1991 ते 2001 या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात हजारो नवीन गावातील शाळांचे बांधकाम त्यांनी करून दाखविले. याच काळात राज्याचा साक्षरता दर 1991 च्या 45 टक्क्यांवरून 2001 पर्यंत लक्षणीयरित्या 64 टक्क्यांपर्यंत वाढला. मुलींच्या शिक्षणातील सुधारणा अधिक होती. स्थानिक पातळीवर नामांकित आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या प्रशिक्षणासाठी वित्तपुरवठाही विशेष ठरला.

मध्यप्रदेश पुनर्रचना कायद्याच्या अटींनुसार छत्तीसगडला 2001 मध्ये प्रदेशातून प्रशासकीय स्वातंत्र्य मिळाले. नवीन राज्यासाठी मुख्यमंत्री म्हणून अजित जोगी यांची निवड सुनिश्चित करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सिंग यांना निर्देश दिले होते आणि सिंग यांनी ही मोहिम यशस्वी केली. अर्जुनसिंग आणि विद्याचरण शुक्ल अशा राज्यातील ताकदीच्या नेत्यांसोबत स्पर्धा करत दिग्गीराजांनी आपले स्थान निर्माण केले होते. एकेकाही हेच नेते त्यांचे मार्गदर्शक होते. मात्र वेळ येताच त्यांच्यापासून फारकत घेत पुढे सरकण्याचे राजकीय कौशल्य त्यांनी दाखविले होते. 2001 मध्ये राज्यातील सत्ता गेल्यानंतर त्यांनी दशकभर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2008 मध्ये त्यांच्या मतदारसंघातून त्यांचे चुलत बंधू आमदार झाले. याच काळात ते पक्षाच्या केंद्रीय संघटनेनत सक्रीय झाले. पक्षाचे सरचिटणीस झाले. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पक्षाच्या संघटना बळकटीसाठी प्रयत्न करू लागले. जानेवारी 2014 मध्ये मध्यप्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले. 2019 च्या भारतीय लोकसभा निवडणुकीत ते भोपाळ मतदारसंघातून प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडून पराभूत झाले.

दिग्विजय सिंह काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. अत्यंत मुरलेले नेते असूनही केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. याचे कारण त्यांच्या हस्तरेषांमध्ये दडले आहे. त्यांचा उजवा हात पहिल्यास तो ऐश्वर्यसंपन्न दिसतो. राजघराण्यातील वारसदार असल्याने त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पावत असताना तिचा मूळ उगम मणीबंधापासून उगम होऊन पुढे ती आयुष्य रेषेला छेद देऊन शनी ग्रहावर गेली आहे, अशी स्थिती असता अशा लोकांकडे पिढीजात श्रीमंती असते, ऐश्वर्य व धन विपुल असते. भाग्य रेषा जर शुक्र ग्रहावरून उगम पावताना आयुष्य रेषेच्या थोडीशी आतून जरी उगम पावत असेल किंवा तिला जोडणारी एखादी रेषा शुक्र ग्रहावरून आयुष्य रेषेला जाऊन मिळत असेल तरी अशा व्यक्तींना त्यांच्या वाडवडिलांच्या संपत्तीत किंवा लांबच्या नातलगांकडून त्यांचा चल-अचल संपत्तीत निश्चित वाटा मिळत असतो.

येथे तर दिग्विजय यांच्या हातावरील भाग्य रेषेचा उगम शुक्र ग्रहाच्या पायथ्यापासून म्हणजेच मणी बांधाच्या जवळून होत आहे व ती थेट शनी ग्रहावर गेलेली आहे. आयुष्य रेषा अतिउत्तम आहे. त्यामुळे शारीरिक क्षमता मोठी व निरोगी प्रकृती आहे. आयुष्य रेषेला मंगळ रेषेचे कवच आहे. त्यामुळे उत्साही व कामसू व्यक्तिमत्व आहे. मंगल रेषा हातावर अखंड असता असे लोक लवकर थकत नाहीत. त्यांचे अंगी ऊर्जेचा संचार असतो. मस्तकरेषा सरळ वरच्या मंगळ ग्रहावर हृदय रेषेच्या खाली व हाताच्या कडेने हाताच्या बाहेर (करंगळीच्या बाजूला) गेलेली असल्याने यांचे अंगी हुशारी, अविरत काम करण्याची क्षमता व काताची तड लावण्याची क्षमता आली आहे. रवी ग्रहावर जाताना रवी रेषा करंगळी व रवी ग्रहाच्या बोटांच्या मध्ये गेल्याने सन्मान व कीर्ती लाभली आहे.

हाताच्या बोटांपैकी करंगळीचे बोट सरासरीपेक्षा लहान आहे. त्याची पेरेसुद्धा लहान आहेत. त्यामुळे जनसभा गाजवता आल्या नाहीत. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना आपले मनोगत किंवा भावना व्यक्त करताना ते मागे राहिले. आपल्याला अमुक एक पद मिळाले पाहिजेच, असा आग्रह धरता आला नाही. त्यात ते कमी पडले. हृदय रेषेचे गुरु ग्रहावर दोन फाटे आहेत. एक वरती बोटाकडे गेला आहे. दुसरा मस्तक रेषेकडे गेला आहे. त्यामुळे भावनिकता वाढली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हृदय रेषेचा एक तुकडा शनी ग्रहावर स्वतंत्रपणे आडवा झालेला आहे. ही आडवी रेषा म्हणजे हृदय रेषेचीच सिस्टर लाईन आहे.

शनी ग्रहावर हृदय रेषेचा एखादा तुकडा आडवा गेलेला असेल तर अशा लोकांची सहज होणारी कामेही रेंगाळतात. शनी ग्रहावरील आडवा हृदय रेषेचा तुकडा तुमच्या आयुष्यात प्रगतीला आडवा आलेला असतो. तुम्ही कितीही हुशार असा लायक असा या शनीवरील आडव्या तुकड्याने महत्वाची कामे मागे पडतात किंवा त्यापैकी काही कामे आयुष्यभर होत नाही. याच शनिवरच्या आडव्या रेषेच्या स्वतंत्र तुकड्याने दिग्विजय सिंग यांना केंद्रात मंत्री पदाला अडकाठी घातली. राष्ट्रीय राजकारणात दिग्गीराजा कमनशिबी ठरले त्यास हातावरील या रेषा कारणीभूत ठरल्या.

-8888747274

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *