Friday, April 26, 2024
Homeनगरमहिन्याच्या आत वीज जोडणी

महिन्याच्या आत वीज जोडणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

1 एप्रिल 2018 नंतर पैसे भरूनही प्रलंबित असणार्‍या कृषिपंप अर्जदारांना त्वरित वीज जोडणी देण्यासाठी ऊर्जा विभागाकडून नवीन धोरण सरकारने जाहीर केले असून

- Advertisement -

याबाबतचा अध्यादेश जारी केल्याने नवीन कृषिपंपास 1 महिन्याच्या आत वीज जोडणी देण्यात येणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच अकृषक ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी सोसायट्या, महिला बचत गट, महिलांचा स्वयं सहाय्यता गट इत्यादींची ‘वीज देयक संकलन एजन्सी’ म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांनाही प्रोत्साहन मोबदला मिळणार आहे.

या धोरणानुसार ज्या कृषिपंपाचे अंतर लघुदाब वाहिनीपासून 30 मीटरच्या आत व वितरण रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे, अशा सर्व नवीन कृषिपंपास 1 महिन्याच्या आत वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या कृषीपंपाचे अंतर 100 मीटरच्या आत व वितरण रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे अशा सर्व नवीन कृषीपंपास 3 महिन्यांच्या आत एरियल बंच केबलद्वारे वीजजोडणी देण्यात येईल. तथापि त्याकरिता आवश्यक असणारी लघुदाब वाहिनी अर्जदारास सुरुवातीस स्वखर्चाने उभारावी लागणार आहे व त्याचा परतावा त्या ग्राहकाच्या वीजबिलामधून करण्यात येईल.

ज्या कृषिपंपाचे अंतर नजीकच्या लघुदाब वाहिनीपासून 100 मीटरपेक्षा जास्त आहे त्यांना पारेषण विरहित सौर ऊर्जेवर वीज जोडणी घेता येईल. दरवर्षी 1 लक्ष या प्रमाणे पुढील पाच वर्षांत 5 लक्ष वीज जोडण्या देण्याचे प्रस्तावित आहे.

नवीन कृषिपंप अर्जदारांच्या कृषिपंपाचे अंतर नजीकच्या उच्चदाब वाहिनीपासून 600 मीटरपेक्षा अधिक असल्यास, त्यांना डीडीएफ योजनेअंतर्गत वीज जोडणी नको असल्यास त्यांना पारेषण विरहीत सौर ऊर्जेवर वीज जोडणी सौर ऊर्जा धोरणानुसार दिली जाईल.

नवीन कृषिपंप ग्राहकांच्या समूहाला उच्चदाब वितरण प्रणालीवर तात्काळ वीज जोडणी मिळेल. त्यासाठी 16 ते 25 के.व्ही.ए. क्षमतेच्या वितरण रोहित्रावर जास्तीत जास्त 2 वीज जोडणी देण्यात येईल. कालवे, बंधारे, तळे, नदी जवळ येणार्‍या कृषिपंपाच्या समूहाला वीजजोडणी देण्यासाठी 63 ते 100 के.व्ही.ए. क्षमतेच्या वितरण रोहित्रावर जास्तीतजास्त 5 ते 7 वीज जोडण्या देण्यात येतील.

कृषिपंप ग्राहकांच्या समूहाला, एच.व्ही.डी.एस. प्रणालीवर वीज जोडणी घेण्यासाठी पायाभूत सुविधा सुरुवातीला स्वखर्चाने केल्यास महावितरणद्वारे दर माह त्याची परतफेड विद्युत बिलातून होईल.

वसुलीपोटी ग्रामपंचायतींना मोबदला

वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ती वसुली करण्यासाठी सरकारने आता ती जबाबदारी इच्छुक ग्रामपंचायतींकडे सोपवली आाहे. वीज बिल भरणा केंद्र म्हणून प्रती वीजबिल वसुलीसाठी 5 रुपये निश्चित थकबाकी वसूल केल्यास, वसूल केलेल्या थकबाकीच्या 30 टक्के, चालू वीजबिल वसूल केल्यास, वसुली रकमेच्या 20 टक्के मोबादला देण्यात येणार आहे.

कर्मचार्‍यांनाही प्रोत्साहन..

चालू थकबाकी वसुलीसाठी कर्मचार्‍यांचीही मदत घेण्यात येणार असून त्यांनाही मोबदला देण्यात येणार आहे. वसूल केलेल्या रकमेवर लाईन स्टाफला 1 टक्का, शाखा प्रमुख 0.50 टक्के, उपविभागीय अधिकारी 0.25, उपविभागीय बिलिंग कर्मचारी एकत्रितपणे 0.25. कायमस्वरूपी थकबाकी वसूल केलेल्या रकमेवर लाईन स्टाफला 10 टक्का, शाखा प्रमुख 5 टक्के, उपविभागीय अधिकारी2.5, उपविभागीय बिलींग कर्मचारी एकत्रितपणे 2.5 टक्के राहणार आहे.

साखर कारखान्यांना 10 टक्के

कृषीपंप ग्राहकांची थकबाकीची रक्कम वसूल केल्यास शेतकरी सहकारी संस्था, तसेच साखर कारखान्यांना वसूल केलेल्या रक्कमेच्या 10 टक्के रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या