मंत्र्यांच्या घोषणेमुळे एक हजार रिक्त जागांचा बॅकलॉग भरण्याची आशा

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नुकतेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 16 हजार आरोग्य कर्मचार्‍यांची पदे भरण्याचे जाहीर केले आहे. यात नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सुमारे एक हजार पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, अद्याप याबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडे कोणत्याच सूचना आल्या नसल्याचे सांगण्यात आले.

एकीकडे राज्य व केंद्र सरकारकडून करोना विरोधात लढायचं आहे, अशा प्रकारचे बोललं जात असताना दुसरीकडे खरे करोना योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड दबाव वाढत आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील तब्बल 1 हजार पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत एकूण 96 प्राथमिक आरोग्य केंद्र असून 555 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. करोनामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा भार वाढला आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य कर्मचार्‍यांची एकूण 2 हजार 249 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1 हजार 314 पदे भरण्यात आली आहेत. तर तब्बल 935 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये प्रामुख्याने 12 वैद्यकीय अधिकारी, 506 आरोग्य पर्यवेक्षिका, 21 औषध निर्माण अधिकारी, 20 आरोग्य सहायक महिला, 292 आरोग्य सेवक पुरुष, 11 आरोग्य सहायक पुरुष, 7 आरोग्य पर्यवेक्षक 4 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तसेच 54 सफाई कामगारांचा समावेश आहे. यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी अशी महत्वाची पदे भरण्यात आलेली नाहीत.

दुसरीकडे जिल्हा रुग्णालय व त्यांच्या अधिनस्त असलेल्या ग्रामीण रुग्णालयांची स्थिती बरी म्हणावी लागेल. जिल्हा रुग्णालयात 306 पॅरामेडिकल कर्मचार्‍यांच्या जागा मंजूर आहेत. त्यापैकी 209 जागा भरलेल्या असून, 97 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 च्या 50 मंजूर जागांपैकी 16 जागाच भरलेल्या असून, तब्बल 34 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 च्या 197 मंजूर जागांपैकी 136 जागा भरलेल्या असून, 61 जागा रिक्त आहेत. नर्सिंग कर्मचार्‍यांच्या 100 जागा रिक्त असून, त्यापैकी 97 भरण्यात आलेल्या आहेत.

ग्रामीण रुग्णालयांमध्ये अधिपरिचारिकांची 300 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 280 पदे भरण्यात आलेली आहेत. तर 20 पदे रिक्त आहेत. यातील 32 कर्मचारी हे कंत्राटी आहेत. करोनाने देशभरात गंभीर रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली आहे. अनेक आरोग्य कर्मचारी स्वतः करोनाने बाधित झाले आहेत. त्यामुळे ते रजेवर आहेत. त्यामुळे कमी कर्मचार्‍यांमध्ये काम भागवण्याचे आवाहन आरोग्य विभागापुढे आहे. दरम्यान, आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *