Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedसकारात्मक संकेत

सकारात्मक संकेत

– सतीश जाधव

दुसर्‍या लाटेने देशात भूतो न भविष्यती: अशी स्थिती निर्माण केली आहे. दररोज तीन लाखांपेक्षा आढळून येणारे रुग्ण आणि तीन हजाराहून अधिक संख्येने मृत्युमुखी पडणारे नागरिक हे चित्र कोरोनाचा भेसूर चेहरा दाखवणारे आहे.

- Advertisement -

फेब्रुवारीच्या मध्यान्हीनंतर दुसर्‍या लाटेने आपले अक्राळविक्राळ रुप दाखवण्यास सुरवात केली आणि देशातील सर्व बेड हाउसफुल्ल झाले. दोन महिन्यांपासून वाढत्या संख्येने हतबल झालेली आरोग्य यंत्रणा आता गेल्या काही दिवसांपासून सरकारी आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येत कमी होणारी घट पाहता समाधान व्यक्त करत आहे. रुग्णांची संख्या पुढेही घसरत राहवी, एवढीच अपेक्षा आपण करु शकतो.

देशातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या आता 25 लाखांवर पोचली आहे. दुसरी लाट जीवघेणी ठरली आहे. कोविडच्या या नव्या रुपाने डबल म्यूटंटने बाधित होणार्‍या नागरिकांना स्वत:ला सावरायला वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. बाधा झाल्यानंतर एका आठवड्यातच संसर्गाचे विषाणू फुफ्फुसावर जोरदार हल्ला करत आहेत. त्यामुळे रुग्ण वाचणे कठिण जावू लागले आहे. परिणामी रुग्णवाहिका, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. दोन महिन्यांपासून देशात दुसरी लाट आलेली आहे. काही दिवसांपूर्वी बाधितांचा आकडा चार लाखांपेक्षा अधिक झाला. दुसरी लाट वेगाने वाढल्याने अनेक राज्यांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला. आता या लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. देशातील सुमारे 18 राज्यांत कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होऊ लागले आहेत.

दुसरीकडे काही राज्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारच्या चिंतेत भर पडत चालली आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगण, चंडीगड, लडाख, दमन आणि दीव, लक्षद्विप, अंदमान आणि निकोबार येथे कोविडचे प्रकरणे कमी होऊ लागले आहेत. याशिवाय कोरोनाचा अधिक प्रभाव असलेल्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाना, छत्तीसगड, बिहार आणि गुजरातमध्ये रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. उत्तर प्रदेेशमध्ये 30 एप्रिलनंतर कोविडच्या प्रकरणात घट होऊ लागली आहे.

ही बाब समाधानकारक आहे. पण कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, आसाम, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड आणि अरुणाचल प्रदेशात मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एक लाखांपेक्षा अधिक सक्रिय असणार्‍या राज्यांची संख्या तेरा आहे. 1 लाख ते 50 हजार यादरम्यान रुग्ण असलेल्या राज्यांची संख्या 6 आहे. तर 50 हजारापेक्षा कमी सक्रिय असणार्‍या राज्यांची संख्या 17 आहे. संपूर्ण देशात सध्याच्या काळात सरासरी पॉझिटिव्ह रेट हा सुमारे 21 टक्के आहे. सरकारने आणि नागरिकांनी देखील सकारात्मक पावले टाकल्याने नवीन रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्याचवेळी ऑक्सिजनचा पुरवठा देखील सुरळीत होऊ लागला आहे.

गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीएम केअर्समधून 1 लाख ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी करण्यात आली आहे. रुग्णांची गरज भागवण्यासाठी जगभरातून 5805 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन मागवण्यात आले. 7049 मेट्रिक टन क्षमतेचे टँकर एलरलिफ्ट करण्यात आले. 1407 मेट्रिक टन क्षमतेचे 81 कंटेनर्स हे हवाई दलाच्या माध्यमातून परदेशातून आणले. 157 ऑक्सिजन विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या. रुग्णसंख्या कमी होत असल्याने देशातील 18 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात सरकारी नियमात सवलती दिल्या.

आता एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही. जर रुग्णाला पाच दिवसांपासून ताप नसेल तर त्याला डिस्चार्ज करताना आरटी पीसीआरची गरज नाही. एवढेच नाही तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून बाहेर येण्यासाठी भारत आघाडीवर राहत आहे. अशावेळी सरकार आणि नागरिक यांनी परस्पर सामजस्यांनी काम केले तर दोन-तीन आठवड्यात कोरोनाचा वेग आणखी मंदावू शकतो. त्याचबरोबर लसीकरण मोहीम वेगाने चालवणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या